परभणी : राज्याचा तब्बल ७५ टक्के भाग दुष्काळाच्या छायेत आला आहे. राज्यभरात शेतकरी आत्महत्येच्या संख्येत दिवसांदिवस मोठी वाढ होत आहे. असे असूनही राज्य सरकार केवळ शासन निर्णय काढण्यातच मग्न आहे. अशा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मदत निधीतून राज्याला मदत मिळावी अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त रविवारी (दि.२७) ठाकरे यांनी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या गावी भेट दिली.यावेळी माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, परभणी लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार कैलास पाटील, पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, माजी आमदार मीराताई रेंगे, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, सदाशिवराव देशमुख, महापौर सय्यद इकबाल, शिवलिंग बोधने, प्रभाकर जैस्वाल आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांनी टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळातील शेतात दुष्काळाने होरपळलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मागील वर्षी राज्याच्या अनेक भागांत वारंवार अतिवृष्टी झाली त्यामुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची हातची पिके गेली. शेतकरी मागील दोन, तीन वर्षापासून अडचणीत आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा बनत चालला आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी सरकार केवळ जीआर काढत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. अन्यथा शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ठाकरे यांनी दिला.
राज्य सरकारमधील अनेक मंत्री मागील काही दिवसांपासून दुष्काळाची पिक पाहणी करीत आहेत, मात्र असे असूनही अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतकऱ्यांसह पिण्याचे पाणी, पशुधन, चारा, बेरोजगारी अशा अनेक समस्या येत्या काळात भेडसावतील. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. मात्र सरकार गोंधळलेले असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
दरम्यान, राज्यभरात उद्भवलेल्या अभूतपूर्व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व २६५ तालुक्यांमध्ये मदत केंद्र उभारून शेतकरी आणि नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने दुष्काळाच्या यादीतून काही तालुक्यांचा वगळले असून त्यांचा समावेशही दुष्काळी तालुक्यात करण्याची मागणी यावेळी ठाकरे यांनी केली.
