कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. अटकेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. आम आदमी पार्टीने येथील भाजप कार्यालयावर मोर्चा काढून या कारवाईचा निषेध केला. ‘आप’चे कार्यकर्ते महावीर महाविद्यालयाजवळ आले असता त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी आप कार्यकर्त्यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखल्याने कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची तारांबळ उडाली होती. यावेळी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी मोर्चात सहभाग नोंदवला.
कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली आप नेते मनीष सिसोदिया व खासदार संजय सिंह यांना याआधी अटक झाली होती. तर आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेच्या विरोधात कोल्हापुरात आमच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. गेल्या दीड वर्षामध्ये अनेक छापे टाकून देखील कोणतीही ‘मनी ट्रेल’ न सापडल्याने न्यायालयाने ईडीला झापले होते. लोकसभा निवडणूक आचारसहिता लागू असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करणे म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका आप प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी केली.

हेही वाचा – समाज, राजकारणाची दिशा सुधारण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने सगळे पक्ष पंतप्रधान मोदींचा विरोधात – शाहू महाराज

ईडीने कारवाई केलेल्या चौदा कंपन्यानी इलेक्टोरल बॉण्ड्स (निवडणूक रोख्यांच्या) माध्यमातून भाजपला शेकडो कोटींच्या देणगी दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई थाबवण्यात आल्याचा आरोप अतुल दिघे यांनी केला.

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

काँग्रेसचे ऋषिकेश पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, आप जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, किरण साळोखे, कुमाजी पाटील, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.