सोलापूर: “राज्यातील शेतकरी अभूतपूर्व दुष्काळी संकटात होरपळत असताना सत्ताधाऱ्यांना केवळ औपचारिक पाहणी दौऱ्यांचे सोपस्कार करण्यात रस आहे. आज खरी गरज बांधावर जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याची आहे. शेजारील कर्नाटक सरकारने केव्हाच दुष्काळ जाहीर केला, मग महाराष्ट्र सरकार नेमकी कोणाची वाट पाहत आहे? राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारने तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा,” असा थेट हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीची पाहणीसाठी ठाकरे शनिवारी सोलापूरच्या दौर्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत होते. या दौर्यात त्यांच्य समवेत माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, उपनेत्या तथा सोलापूरच्या संपर्क प्रमुख प्रा. सषमा अंधारे, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड, दक्षिण सोलापूरचे तालुका समन्वयक संदीप मेंडगुदले आदी उपस्थित होते.दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, तांदूळवाडी परिसरातील शेतकर्यांच्या गावातील बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. त्यानंतर पुढे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, उमरगा परिसरातील दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी गेले.
‘कंत्राटदारांचे खिसे भरणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर’
राज्यसरकारच्या आर्थिक धोरणावर टिका करताना ते म्हणाले, “शक्तीपीठ महामार्ग, रस्त्यांच्या खर्चातील वाढ आणि कंत्राटदारांची देणी भागवण्यासाठी सरकारकडे तात्काळ निधी उपलब्ध होतो. मात्र, बळीराजाला मदत करताना तिजोरीच्या अडचणी पुढे केल्या जातात. केंद्र सरकारकडील ‘पीएम केअर्स’ आणि आपत्ती निवारण निधीचा वापर शेतकऱ्यांसाठी का केला जात नाही ? महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंनी थेट कर्जमुक्ती दिली होती, म्हणूनच आजही बांधावरचा शेतकरी त्या मदतीची आठवण काढतो आहे. सत्तेसाठी सोलापुरात ‘पुन्हा मुख्यमंत्री’ अशी बॅनरबाजी करणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, असा टोला त्यांनी लगावला.
‘पाऊस आलाच नाही, तर परतीचा कसला?’
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दौरे काढले, त्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, “पाहणी दौरे झाले, मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले? ‘लवकरच शासन निर्णय काढून दुष्काळ जाहीर करू’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, मग तो आदेश अद्याप का निघाला नाही? परतीच्या पावसाची वाट पाहण्याचे कारण दिले जात आहे; पण मुळात पाऊसच पडला नाही, तर परतीचा पावसाची कसली वाट पाहता? सोलापुरात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सरकारने ऑनलाइन डॅशबोर्ड आणि मदत केंद्रे सुरू करून थेट मदत पोहोचवावी.”
‘ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर घणाघात करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “देशात मतांची चोरी झाली हे आता उघड झाले आहे. २०२४ च्या निवडणुकीपासून आम्ही हा मुद्दा पुराव्यानिशी मांडतोय. माझ्या वरळी मतदारसंघात २४ हजार बोगस मतदार आढळले होते. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना केवळ पदावरून हटवून चालणार नाही, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले पाहिजे. ज्यांनी सरकार बसवून दिले, त्यांना सत्ताधारी कदाचित भारतरत्नही देतील; पण देशद्रोह करणाऱ्यांना पुरस्कार देण्याची नवी प्रथा सुरू करू नये, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील १४ फुटांवरील बांधकामे तोडण्यावरून भाजप आमदार अमित साटम यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, “शहर आणि प्रशासन कसे चालवायचे, याचे भान भाजपला राहिलेले नाही. महापालिकेत सत्ता आणि आयुक्त त्यांचेच असताना ते स्वतःच्याच प्रशासनाविरोधात पत्रे लिहून निव्वळ देखावा करत आहेत, अशीही टीका त्यांनी केली.
