सोलापूर । सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीसाठी मंगळवारी रात्री पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. संतोष पाटील यांनी १३६ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. उपाध्यक्षपदी अ‍ॅड. परमानंद जवळकोटे व महिला उपाध्यक्षपदी अ‍ॅड. शर्मिला देशमुख, तर सचिवपदी अ‍ॅड. जयप्रकाश भंडारे विजयी झाले.

मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये एकूण १६८४ मतदारांपैकी १४३८ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीसाठी ५८ गठ्ठे तयार करण्यात आले होते.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत अ‍ॅड. संतोष पाटील यांना ७४७ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी अ‍ॅड. राजेंद्र फताटे यांना ६११ मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये अ‍ॅड. एस. आर. रेशमे यांना १४० मते आणि अ‍ॅड. मल्लिनाथ म्हमाणे यांना २७ मते मिळाली. (अवैध मते: १३).

उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. परमानंद जवळकोटे यांनी सर्वाधिक १०२९ मते मिळवून एकतर्फी विजय नोंदवला, तर अ‍ॅड. परवेज ढालायत यांना ३६२ मते मिळाली (अवैध मते: ४७). महिला उपाध्यक्षपदावर अ‍ॅड. शर्मिला देशमुख यांनी ८८४ मते मिळवून विजय संपादन केला; त्यांनी अ‍ॅड. उर्मिला जहागीरदार (५०६ मते) यांचा पराभव केला (अवैध मते: ४८).

इतर पदांचे निकाल:

सचिव: अ‍ॅड. जयप्रकाश भंडारे – ८०२ मते (विजयी), अ‍ॅड. मंजुनाथ कवकलमेळी – ६०५ मते.

सहसचिव: अ‍ॅड. प्रियंका गोरंटी – ६८५ मते (विजयी), अ‍ॅड. आर. एल. लगशेट्टी – ५४० मते, अ‍ॅड. मेघना मलपल्ली – १७५ मते.

खजिनदार: अ‍ॅड. सिद्धाराम पाटील – ५६२ मते (विजयी), अ‍ॅड. अंजली बाबरे – ३४३ मते, अ‍ॅड. संतोषकुमार बाराचारे – २८९ मते, अ‍ॅड. मंगेश कंदलगावकर – २१२ मते, अ‍ॅड. नरेंद्रकुमार गावडे – १४ मते.

नव्या अध्यक्षांचा संकल्प, वकिलांच्या सुरक्षेला प्राधान्य….

“वकिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवून सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देणार. प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी काम करणार. जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत होईपर्यंत पहिल्या मजल्यावर वकिलांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारण्यावर विशेष भर देणार आहे. त्यामुळे वकिलांचा वेळ वाचेल. यासोबतच नोटरीच्या कामासाठी अनेक नागरिक येतात. बेशिस्त वाहनांची रांग असते, त्यांना पर्यायी पार्किंग व्यवस्था करीत शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करणार.” “महसूल विभागाशी संबंधित दाव्यांच्या सुनावणीवेळी वकिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानजनक वागणूक मिळावी, यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था केली जाईल, यासाठी आग्रहाची भूमिका असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही काळात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना भीतीमुक्त वातावरणात काम करता यावे, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची भूमिका घेणार असल्याचे अ‍ॅड. संतोष पाटील यांनी सांगितले. वकिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना उत्तम सोयीसुविधा मिळवून देणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.”