कोल्हापूर : करोना काळात संघ स्वयंसेवकांनी अविरत सेवा कार्य केले. काही स्वयंसेवकांना प्राणही गमवावा लागला. करोनानंतर संघ कार्याची गती अधिक वाढावी. समाजातील सर्व घटकांवरून दिसेल अशा उपक्रमांचे आयोजन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

कणेरी येथील सिद्धगिरी मठावर केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. संघटनात्मक बाबीबरोबरच सेवाकाम, ग्रामविकास, धर्मजागरण, गोसंवर्धन, पर्यावरण अशा उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. करोनामुळे संघाचे प्रशिक्षण वर्ग होऊ शकले नव्हते. नजीकच्या काळात ते कसे घेता येतील यावरही चर्चा झाली.  दोन दिवसांच्या बैठकीचा समारोप भागवत यांनी केला. ते म्हणाले, २०२५ साली संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आजपर्यंत संघाने ज्या ज्या क्षेत्रात काम केले हे सर्व काम परिणामस्वरूप समाजासमोर येईल अशा पद्धतीने उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपला विचार करावा. सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुणकुमार, सुरेश सोनी, रामदत्त हे उपस्थित होते.