कोल्हापूर : इचलकरंजी येथे विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त तरुणांच्या जमावाने ॲकॅडमीच्या मुख्य इमारतीवर जोरदार दगडफेक करत तोडफोड केली होती. या प्रकरणी १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रथितयश ॲकॅडमीत बारावीत शिकत असलेल्या यश अजित यादव (वय १७, रा. पलूस) या विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केली. या घटनेचा निषेध नोंदवत सायंकाळी संतप्त युवकांनी जमावबंदी आदेश असताना ॲकॅडमीच्या इमारतीवर जोरदार दगडफेक करून इमारतीच्या काचा फोडल्या. फुलझाडांचे नुकसान केले. अकादमीचा फलक फाडून अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान केले.

या प्रकरणी पोलीस शिपाई आदित्य दुंडगे यांच्या फिर्यादीनुसार माजी आमदार राजीव आवळे यांचा मुलगा संशयित राहुल आवळे, इंद्रजित घोरपडे, संतोष आवळे, जमिल मोमीन, आर्यन लोखंडे, वैभव पवते, पवन तडाखे, सतीश आवळे, अजित भोरे, वसीम कलावंत, महेश केंगार, किशोर आवळे, दस्तगीर बागवान, अमर आळंदे, सचीन कुंभार या १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.