कोल्हापूर : राज्य सरकारने उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. एकरकमी एफआरपी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. यामुळे राज्य सरकार विरुद्ध आरपारची लढाई लढणार असून याविरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला आहे.
याबाबत शेट्टी म्हणाले,की उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने विश्वासघात करून घेतला आहे. त्यावर पुनर्विचार करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त तसेच संबंधित खात्याचे सचिव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. राज्य सरकारला एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा अधिकार नसल्याने ती एकरकमी देण्याची मागणी केली होती. सहकार विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांनी पत्राद्वारे कारखान्यांच्या बाजूनेच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत एफआरपी दोन टप्प्यातच दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. यात शेतकऱ्यांचा तोटा होणार नसल्याने तो कदापि बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता साखर कारखानदारांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या या निर्णयाविरूध्द मी याचिका दाखल केली आहे. एफआरपी एकरकमी वसूल केल्याशिवाय सोडणार नाही. रस्त्यावरील संघर्ष अटळ असून याचे गंभीर परिणाम आघाडी सरकारला भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले.