कोल्हापूर

घरगुती वीज देयकातील झालेली दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी वीज देयक प्रतींची होळी करून शंखध्वनी करण्यात आला. टाळेबंदीच्या तीन महिन्यातील घरगुती वीज देयकामध्ये ५ ते १५ टक्के वाढ झालेली आहे. एकूण तीन महिन्याचे युनिट समाविष्ट झाल्याने ज्यादा युनिटचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. मंदीमुळे कामगारवर्गांतील बहुतांश लोकांच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे बंद पडले आहेत. यातच घरगुती महावितरण कंपनीने घरगुती वीजदेयका मध्ये दरवाढ करून धक्का दिला आहे. त्याची जबरदस्तीने वसुली केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदनद्वारे देण्यात आला. आंदोलनात विठ्ठल मोरे, शैलेश आडके, शैलेश चौगुले, शंकर नाळे, सागर मादनाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दुसरीकडे डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही इंधन दरवाढीविरोधात निदर्शने केली. कामगारांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात कोल्हापूरातील डाव्या आघाडीच्या वतीने बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. करोना संसर्गामुळे जाहीर केलेल्या टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन कामगारविरोधी धोरण राबवले जात असून शासनाचा हा डाव डावी आघाडी उधळून लावेल, असा इशारा चंद्रकांत यादव यांनी दिला. भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेच्या विरोधात असून ते भांडवलदारांचे आहे असा आरोप केला. तसेच इंधनामध्ये दरवाढ केल्याने सामान्य जनतेला झळ बसली असल्याच्या तथ्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.