अहिल्यानगर: शहराच्या कोठला भागातील राजचेंबर परिसरात गोळीबार करणाऱ्या तसेच शहरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघा आरोपींना त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी आज, सोमवारी हातात बेड्या घालून कोठला व मुकुंदनगर परिसरात पायी फिरवले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आरोपींकडे तपास सुरू असून, या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी होते, कोणाच्या सांगण्यावरून गुन्हा केला, याचा तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी सांगितले.

दि. ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कोठला परिसरात ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या अबरार मुख्तार शेख यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी जाबीर उर्फ जबु सादीक सय्यद (वय ३४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), कादर उर्फ पप्पु मुस्सा शेख (वय ३८, रा. कोठला झोपडपट्टी), जैद उर्फ टैप्या रशीद सय्यद (वय ३५, रा. आलमगीर) यांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून, राहत्या घराच्या परिसरात त्यांची दहशत आहे. ही दहशत मोडून काढण्यासाठी उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तिघांनाही बेड्या घालून कोठला व मुकुंदनगर परिसरात पायी फिरवले. आरोपीच्या घरांची झडतीही घेण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या गोळीबाराच्या घटनेमागे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील वादाचे कारणही आहे. निवडणुकीवेळी दाखल झालेल्या गुन्ह्यातून व हे गुन्हे मागे घेण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचे अबरार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ‌

तिन्ही आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दरोड्याचे २३ गुन्हे

जैद उर्फ टैप्या रशिद सय्यद याच्यावर अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यामध्ये १५ गुन्हे दाखल आहेत. यात घरफोडी, दंगा, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तर, जाबीर उर्फ जबु सादीक सय्यद याच्यावर शहरात चोऱ्या व मारहाणीचे गुन्हे आहेत. कादर उर्फ पप्पु मुस्सा शेख याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. जाबीर उर्फ जबु सादीक सय्यद याला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. उर्वरित दोन्ही आरोपींविरुद्ध प्रत्येकी चार असे तिघांविरुद्ध एकूण २३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली.