सातारा: ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्या वरून खोल दरीत कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अद्याप पर्यटकाची ओळख पटलेली नाही. किल्ले अजिंक्यतारावर फिरण्यासाठी गेलेला एक पर्यटक दरीच्या कड्यावर खाली पाय सोडून बसलेला असताना साधारण २०० फूट खोल दरीत कोसळला. आज सकाळी ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा माहिती मिळताच साताऱ्यातील ‘शिवेंद्रसिंहराजे मदत पथक (ट्रेकर्स टीम) तातडीने घटनास्थळी रवाना झाली. दरीत कोसळलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदत कार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सुरू करण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती किल्ल्याच्या कड्यावरून पाय घसरून थेट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मदत पथकाने (ट्रेकर्सच्या टीम) आवश्यक साहित्यासह किल्ल्यावर धाव घेतली. दरीची खोली आणि ठिकाण अत्यंत दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठे आव्हान उभे राहिले. मात्र ट्रेकर्सचे पथक दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बचाव पथक सुरक्षितरीत्या पर्यटकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र घटनास्थळीच पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मदत पथकाने झोळी द्वारे मृतदेह बाहेर काढला. अडचणीच्या ठिकाणी मृतदेह असल्याने बाहेर काढताना मदत पथकाला काट्याकुट्यातून उंच गवतातून मार्ग काढावा लागला.
पोलीस प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अजिंक्यतारा किल्ल्यावर सातारा शहरासह जिल्ह्यातून आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटकांनी गड-किल्ल्यांच्या कड्यावर उभे राहून सेल्फी काढताना किंवा फिरताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
