कोल्हापूर : दुग्ध व्यवसायामध्ये तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे असून, गोकुळसारख्या संस्थांनी त्याचा अवलंब करण्यात आघाडी घ्यावी. शासनस्तरावर त्याचा मागोवा घेऊन आम्ही सहकार्य करू. दूध व्यवसाय वाढीसाठी गोकुळला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. गोकुळचा विस्तार म्हणजे शेतकऱ्यांचा विकास होय, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गोकुळचे नूतन अध्यक्ष नविद मुश्रीफ व संचालक यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांची सदिच्छा भेट घेऊन गोकुळ परिवारकडून सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गोकुळचे संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्य शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गाय दूध अनुदान तत्काळ वितरित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. दुग्ध व्यवसाय वाढीसंदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली. नविद मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन गोकुळच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या.