scorecardresearch

युती सरकारने लोकोपयोगी योजना बासनात गुंडाळल्या

अजित पवार यांची कागलमध्ये टीका

आघाडी सरकारने सुरू केलेल्या लोकोपयोगी योजना बासनात गुंडाळण्याचे काम युती सरकार करीत आहे. राज्यकत्रे सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, राज्य आत्महत्येत प्रथम क्रमांकावर आहे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल येथे केली.
कागल नगरपालिकेने तीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे तसेच नगरोत्थान योजनेतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते  झाले. या वेळी बापूसाहेब चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.
शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू आहे. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असा उल्लेख करून पवार म्हणाले, बाजार समित्या मोडीत काढण्याचे काम सरकार करीत आहे. गुंतवणुकीसाठी विश्वासाचे वातावरण आधी निर्माण करायला हवे, पण ते करण्याऐवजी राजकीय हेतूने हसन मुश्रीफ यांना दहा वष्रे अपात्र ठरवण्याचा कायदा राज्यकर्त्यांनी केला  आहे. शेतकरी संघटना सरकारचे बगलबच्चे असल्याचे सांगत त्यांनी मोदी व फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणातील धागेदोरे अद्याप मिळत नाहीत. हे पोलिसांचे अपयश नाही का, असा प्रश्न उपस्थित करून पवार यांनी यामध्ये काही लागेबांधे असल्याची शंका व्यक्त करीत या घटनाक्रमामागे कोणती दुष्टशक्ती लपली आहे हे समाजाला कळण्याची गरज व्यक्त केली. लोकांनी केलेली चूक दुरुस्त करण्याची ताकद लोकांमध्येच असते. येत्या निवडणुकांमध्ये ती दुरुस्ती करा आणि पुरोगामी विचार द्विगुणित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसला आशीर्वाद द्या, असे आवाहन करीत पवार यांनी निवडणुकीवर डोळा असल्याचे स्पष्ट केले.
मुश्रीफ म्हणाले, अन्यायाविरोधात आणि लोकहितासाठी आम्ही अनेक मोच्रे काढले. या अन्यायी सरकारला वठणीवर आणले पाहिजे. सरकारला गुडघे टेकायला लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, युती सरकार एका विशिष्ट भागाचा विकास करीत आहे. त्यातून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. या विरोधात लढा उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या वेळी मनोहर पाटील, भया माने यांची भाषणे झाली. स्वागत नगराध्यक्ष संगीता प्रकाश गाडेकर व प्रास्ताविक रमेश माळी यांनी केले. आभार मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी केले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar criticises state govt

ताज्या बातम्या