सांगली : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगलीच्या दौऱ्यावर आल्यानंतर भाकरीसोबत मटण, मासे, रस्सा यावर ताव मारत निवडणुकीच्या रणनीतीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
अजितदादा आणि सांगलीचे नाते जिव्हाळ्याचे तर होतेच, पण कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून प्रत्येक दौर्यावेळी कार्यकर्त्यांचे मोहोळ त्यांच्या अवती भोवती नांदत असे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अजितदादांचा मिरज दौरा दोन वेळा झाला तो अल्पसंख्याक समाजाला विश्वास देण्यासाठी. अजितदादांनी सांगली, ईश्वरपूर, मिरज येथील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासले होते.
विकास आघाडीची सत्ता असताना जिल्ह्यातील विकास कामासाठी स्थापन झालेल्या तत्कालिन दुष्काळी फोरमला ताकद देत असताना टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेला निधीची उणिव भासणार नाही असा शब्द त्यांनी फोरमच्या नेत्यांना दिला. आटपाडीची धनगाव नळपाणी योजना मंजुरीसाठी दादांच्या मार्फतच प्रयत्न करावे लागले होते.
जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय घराण्याबाहेरील असणारे विलासराव जगताप, अमरसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे यांना राजकीय ताकद देउन आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. जिल्हा पातळीवर याचे पडसाद कायम उमटत राहिले. काहींनी भाजपची वाट धरली. भाजपमध्ये काही नेते स्थिरावले असले तरी वैयक्तिक पातळीवर अजितदादांनी आपली मैत्री जोपासली होती. यातून सत्तेबाहेर राहूनही ताकद देणारा आणि सत्तेत असताना विकास कामासाठी निधीची तरतूद करणारा नेता अशीच ओळख दादांची जिल्ह्यात निर्माण झाली होती. यातूनच महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले.
ईश्वरपूरमधील केदार पाटील, सांगलीचे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी हे तर अजितदादाचे नातलग. महायुती शासनामध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वाळवा तालुक्यातील पेठला महाडिकांच्या संस्थेला भेट देउन स्नेह वाढवला. सांगलीत मुक्कामी असताना सुर्यवंशीच्या घरी जाउन कौटुंबिक विचारपूस करत नातेही जपण्याचा प्रयत्न केला. तर मिरज दौर्यावर आले असताना बागवान बंधूच्या घरी जाउन अल्पसंख्याक समाजाला विश्वास देण्याचे काम केले.
मटण, मासे आणि भाकरीसांगलीत शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या घरी जेवणाचा बेत खास दादांसाठी करण्यात आला होता. यावेळी दादांची आवड सुके मटण, रस्सा, मासे आणि भाकरी असाच होता. तर गेल्या महिन्यात महापालिका निवडणुक प्रचारादरम्यान, वेळेचे गणित जमत नसल्याचे सांगत माजी महापौर किशोर जामदार यांच्या घरून जेवणाचा डबा घेतला. यातही मटण, मच्छी, रस्सा व भाकरी तर होतीच, पण याबरोबर पिण्याच्या पाण्याची बाटली खास सांगलीतून मागवण्यात आली होती.
