आमच्या महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सर्व आमदारांना समान निधी वाटप केला होता. आताचे शिंदे- फडणवीस सरकार निधी वाटपात आपल्या आमदारांना झुकते माप देत आहे, तर विरोधकांना निधी कमी दिला जात आहे. या पक्षपाती भूमिकेच्या विरोधात आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालय योग्य निर्णय घेईल, असे मत विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी ग्राम पंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

धनुष्यबाण या चिन्हा बद्दल उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही दावा केला आहे. याबाबत विचारणा केल्यावर पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून तो राज्याच्या कानाकोपऱ्यात नेला. १९९५ साली त्यांनी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्रीही केला. त्यांनीच उद्धव ठाकरे हे यापुढे शिवसेनेचे प्रमुख असतील असे घोषित केले होते. ही पार्श्वभूमी नाकारता येणार नाही.निवडणूक चिन्हाचा हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असून तेथे योग्य निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

असे कितीतरी येतात नी जातात
भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे ध्येय ठेवून पवार कुटुंबियांना घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत विचारणा केली असता पवार यांनी ‘ असे कितीतरी येतात आणि कितीतरी जातात ‘ अशा शब्दात विरोधकांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, कोणाला निवडून द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय मतदारांच्या हाती आहे. ते त्यांची भूमिका मांडतील; आम्ही आमचे मांडत राहू. निवडणुकीत योग्य तो फैसला होईल.

…तर या बाबालाही घरी बसावे लागेल
गेल्या अडीच वर्षापासून शिवसेना फोडण्याचे प्रयत्न सुरू होते, असा विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारूढ झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. अडीच वर्षानंतर त्यांच्या त्यांचे प्रयत्न यश आले आहेत. पण १४५ हा आकडा बदलला की या बाबालाही घरी बसावे लागेल,असा सूचक इशारा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून दिला.