कोल्हापूर : दहा वर्षानंतर होत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या रिंगणात ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातून १७ उमेदवार निवडले जाणार आहेत. नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा चित्रकर्मींमध्ये सुरू झाली आहे.
चित्रपट महामंडळाची मुदत २०२१ मध्ये संपली होती. सभासद वैधतेचा कायदेशीर मुद्दा उद्भवल्याने निवडणूक रखडली होती. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महामंडळात हालचाली सुरू झाल्या. अखेरच्या दिवशी पर्यंत १५ गटातील १७ जागांसाठी यांच्यासह ६० जणांनी अर्ज दाखल केले.
मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची समर्थ आघाडी, बचाव कृती समिती सह आणखी एखादी आघाडी आकाराला येण्याची चिन्हे आहेत. अभिनेता आनंद काळे पार्श्वगायक आनंद शिंदे, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर आदींनी अर्ज दाखल केले आहेत. एकमेकांच्या नावाने बोटे मोडणारे एकत्रित अर्ज दाखल करताना दिसले. अर्जांची इच्छांनी २५ मे रोजी होणार असून माघारीची मुदत २८ मी आहे २९ मे रोजी चिन्ह वाटप होणार आहे ७ जूनला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
दोन जागा बिनविरोध
चित्रपट महामंडळाची चुरशीने होणार असे चित्र असताना काही जागांसाठी पुरेसे उमेदवार नसल्याचे चित्र आहे. यामुळेच संगीत गटातून आनंद शिंदे आणि संकलन गटातून विजय खोचेकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या दोन जागा बिनविरोध होणार आहेत.
वलयांकितांनी पाठ फिरवली
चित्रपट महामंडळाची निवडणूक असली तरी वलयांकित कलाकारांचा ठळकपणाने अभाव दिसतो. महामंडळातील वादग्रस्त कारभार, वार्षिक सभांमध्ये होणारे वितंडवाद, यातून होणारी अप्रतिष्ठा यामुळे अनेक नामांकितांनी निवडणूकीकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जाते.
नीलम शिर्के आणि वर्षा उसगावकर!
त्यातही लक्षवेधी लढत अभिनेत्री गटात दिसत आहे. मावळत्या संचालिका, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी निवडणूक पुन्हा लढवण्याचे ठरवले असले तरी त्यांना नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटविणाऱ्या नीलम शिर्के यांनी आव्हान दिल्याने ही लढती प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत. शिर्के या बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आहेत.
राजकीय दबाव
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आजवर राजकीय हस्तक्षेप झाला नव्हता. आता महामंडळावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्यांकडून होत आहे. राजकीय दबाव जुगारून निवडणूक लढवणार असल्याचे मावळते उपाध्यक्ष धनाजी यमगर यांनी म्हटले आहे.
