सांगली : अलनिनो मुळे काही भागात अवर्षण तर काही भागात अतिवृष्टीची यावर्षी स्थिती असून जुलै, ऑगस्टमध्ये पश्‍चिम घाटात पाउस झाला तर महापूराचा धोका निर्माण होउ शकतो. यामुळे हिप्परगी बंधार्‍यासह अलमट्टीतील जलसाठा नियंत्रित ठेवावा अशी विनंती जलसंपदा विभागाने कर्नाटक जलसंपदा विभागाला केली असल्याचे कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत असून आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वंभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दि. २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी ५२१.६० मीटर असून आवक ४५,७५० कयूसेक्स तर जावक ४४,९०० कयूसेक्स आहे.

बॅरेजमध्ये ३.९८ टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी ३.१८ टीएमसी उपयुक्त व ०.८० टीएमसी मृत साठा आहे. राजापूर बंधारा  येथील पाणीपातळी ५२५.९०७  मीटर असून तेथून ४८,२५० कयूसेक्स विसर्ग सुरू आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहीत राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत, अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे.

आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१७ ते ५१७.५० मीटर दरम्यान राखण्याचीही विनंती करण्यात आली आहे. सध्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१७.९७ मीटर असून धरणात ५९,८४४ कयूसेक्स आवक व ६० हजार कयूसेक्स विसर्ग सुरू आहे. गतवर्षांच्या अनुभवावरून जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त असते.

सन २०२६ मध्ये अलनिनोचा प्रभाव सक्रिय झाल्यामुळे काही भागांत दुष्काळ तर काही भागांत अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास कृष्णा नदी प्रवाहीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पूर व्यवस्थापनाच्या दृष्टीने आंतरराज्य बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून नेहमीप्रमाणे सकारात्मक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.