सातारा : ऐतिहासिक राजघराण्याच्या वास्तू, मंदिरे, कास पठार, महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात पर्यटकांच्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. सातारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सामान कक्ष (क्लॉक रूम) उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या टोनी बाबावाला या अमेरिकी पर्यटकाने चक्क डोक्यावर कपड्यांची बॅग ठेवून स्थानकात अनोखे आंदोलन छेडले.

भारतातील विविध शहरांना भेट देणारे टोनी बाबावाला पर्यटनासाठी साताऱ्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर अतिरिक्त सामान किंवा कपडे सुरक्षित ठेवण्यासाठी ‘सामान कक्ष नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पर्यटकांसाठी सामान कक्ष ही गरज असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले. स्थानकावर उपस्थित प्रवाशांच्या व नागरिकांच्या मुलाखती घेऊन त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या मुलाखतींचे चित्रीकरण टोनी बाबावाला यांनी समाजमाध्यमावर प्रसारित केले.

इंग्रजी आणि हिंदीतून सातारकरांनीही या पर्यटकाशी संवाद साधत स्थानकावरील सुविधांच्या तुटवड्याबाबत वस्तुस्थिती मांडली. पर्यटनवाढीसाठी मोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र, परदेशी पर्यटकाला सामान ठेवण्यासाठी साधी जागा उपलब्ध न होणे हे प्रशासकीय दाव्यांचे वाभाडे काढणारे ठरले आहे. सातारा रेल्वे स्थानक १८९० चे म्हणजेच सुमारे १३६ वर्षे जुने ब्रिटिशकालीन आहे.

तत्कालीन काळात प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने सामान कक्ष उभारला गेला नव्हता. कक्षाबाबत वरिष्ठ प्रशासनाकडे आधीच प्रस्ताव पाठवला आहे. आता या स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत योजने’त करण्यात आला असून, नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानकात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. गणपत चव्हाण, रेल्वे स्टेशन मास्तर, सातारा