कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व इचलकरंजी या दोन्ही महापालिका क्षेत्रामध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने प्रदर्शनाची तयारी चालवली असताना दुसरीकडे कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका तयारीला गती दिली आहे. रस्ते स्वच्छ करण्याबरोबर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या दूर केल्या जात आहेत.
येत्या १९ व २० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार शहराचे रूप पालटण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. दौऱ्याचे मार्ग असलेल्या (सर्किट हाऊस ते महालक्ष्मी मंदिर परिसर, दसरा चौक इ.) हा परिसर अधिक सुंदर व स्वच्छ करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्त्यांचे पॅचवर्क, खड्डे बुजविणे आणि रस्त्याकडेची धोकादायक झाडे छाटण्याचे काम पूर्ण होत आहे. दौरा मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बॅराकेटींग, अग्निशमन दल सज्जता आणि मोबाईल टॉयलेटची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोल्हापूरकरांच्या वतीने या दौऱ्याचे जंगी स्वागत करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
तयारीची बैठक
केंद्रीय गृह व सहकार अमित शहा यांच्या हस्ते हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजन बैठक इचलकरंजी येथे पार पडली.अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे सहकार, साखर उद्योगासाठी आशादायक चित्र निर्माण होईल. या क्षेत्रासंबंधात त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे,मौश्मी आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यड्रावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्वागत व्यवस्था, उपस्थित मान्यवर व नागरिकांसाठी सुविधा, विविध समित्यांचे नियोजन तसेच कार्यक्रम सुरळीत आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी आवश्यक सूचनांवर चर्चा करण्यात आली.
कल्लाप्पाण्णा आवाडे.बहुराज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाप्रमुख राजवर्धन नाईक निंबाळकर, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादीचे अमित गाताडे संचालक , अधिकारी, विभागप्रमुख तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
