सांगली : या वर्षीच्या पहिल्या अंगारकी संकष्टी निमित्त गणेश दर्शनासाठी सांगलीतील गणेश मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणेश मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणेश मंदिरात, तासगावच्या गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी दिवसभर वर्दळ होती.
मंगळवारी येणारी संकष्टी असेल तर गणेश भक्तामध्ये विशेष भक्तीभाव असतो. यंदाच्या वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी गणेश दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरात गणेश दर्शनासाठी गर्दी केली होती. अंगारकी संकष्टी निमित्त सांगलीतील गणेश मंदिराची खास सजावट करण्यात आली होती.
मंदिराच्या प्रवेश दारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून गणपती पंचायतन मंदिरावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच प्रवेशदारातून आता गेल्यानंतर मुख्य मंदिरासमोरील रंगीत कारंजे खास आकर्षण ठरले होते. मंदिरातील गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता, तर अंगारकी निमित्त श्रींची मूर्तीही खास सजविण्यात आली होती.
याशिवाय हरिपूर रस्त्यावरील चिंचेच्या बनात असलेल्या गणेश मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या. अंगारकी संकष्टी असल्याने गणेश मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरजेतही गणेश तलावाजवळ असलेल्या गणेश मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. तासगावमध्ये गोपूरासाठी प्रसिध्द असलेल्या गणेश मंदिरात दर्शनासाठी तासगावसह विटा, कराड, कवठेमहांकाळ आदी भागातून भाविक आले होते.
अंगारकी संकष्टी निमित्त अनेक मंडळाकडून चंद्रोदयानंतर आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
