|| दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातील नळपाणी योजनेचे पाणी प्रत्यक्षात कधी मिळणार याची विवंचना कोल्हापूरकरांना लागली आहे. योजना पूर्ण करण्याचे मुहूर्त स्वत: बदलत आहेत. आता योजनेचे संकल्पक, पालकमंत्री सतेज पाटील यांनी एप्रिल महिन्यात योजना पूर्ण होईल असे आश्वासन दिल्याने नवी आशा पालवली आहे. विरोधकांनी मात्र या नव्या घोषणेवर अविश्वास व्यक्त केला असल्याने पाणी योजना पुन्हा वादात सापडली आहे.

कोल्हापूर शहरातील दोन प्रश्न गेली अनेक वर्षे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कोल्हापूर महापालिका स्थापन अनेक वर्षे लोटली तरी तिची इंचभरही हद्दवाढ झाली नाही. जिव्हाळ्याचा दुसरा विषय पिण्याचे पाणी. साडेपाच लाख लोकसंख्येच्या कोल्हापूर शहरासाठी आजवर पाच योजना राबवल्या तरी सुरळीत पाणीपुरवठा होण्याचा दुष्काळा काही संपताना दिसत नाही. कळंबा, र्बांलगा, बावडा ते शिंगणापूर अशा योजना राबवूनही कोल्हापूरकरांची तहान काही भागेना. पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने सभागृहातअनेकदा नगरसेविका आक्रमक झाल्या. महापालिकेच्या बाहेर आंदोलन होत राहिले अगदी. अगदी २०१९ आणि यंदाच्या महापुरात निम्मे शहर पाण्याखाली असताना शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती.

पाणीप्रश्नावर रामबाण उपाय म्हणून काळम्मावाडी धरणातील पाणी योजनेकडे पाहिले जात आहे. शहराची २०४५ सालची प्रस्तावित लोकसंख्या साडे दहा लाख गृहीत धरून दैनंदिन २३८ द. श. लि. पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. गेली सात वर्षे योजना रखडली असून ती नेमकी कधी पूर्ण होणार याकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत. योजनेचा प्रस्ताव सादर झाला तेव्हा तो १५४ कोटीचा होता. अंतिम मंजुरी दिली तेव्हा हा खर्च ४२५ कोटी रुपये होता योजनेचा खर्च, कामातील गैरव्यवहार यावरून सत्तारूढ आणि विरोधकांत हमरीतुमरी होत राहिली. या योजनेला ऑगस्ट २०१४ मध्ये कार्यादेश देण्यात आला तेव्हा सव्वा दोन वर्षाची मुदत होती पण अनेक प्रकारच्या मंजुरीचा पत्ताच नव्हता. रडतखडत काम सुरू झाले. ठेकेदार जीकेसी कंपनीचे कासवगतीचे काम पाहून मे २०१८ मध्ये पहिली मुदत वाढवली. पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था राहिल्याने डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. युनिटी कन्सल्टंट कंपनीला अडीच कोटी रुपये देऊन देखरेखीचे काम सोपवले पण ही कंपनी ही देयके मंजूर करण्याच्या पलीकडे फारसे काही काम करताना दिसत नाही.

मंत्र्यांचा पाठपुरावा

ही योजना जिल्ह्यातील मंत्र्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. गेली महापालिका निवडणूक काळम्मावाडी नळपाणी योजनेच्याचा मुहूर्त करून काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकली होती. तेव्हापासून योजना पूर्ण व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू राहिले. निष्क्रिय महापालिका प्रशासन, अक्षम ठेकेदार,गावोगावी निर्माण झालेल्या नानाविध अडचणी, राज्य – केंद्र शासन पातळीवरील मंजुरी या अडथळ्यांवर मात करत योजनेचे काम पुढे न्यावे लागले. जानेवारी महिन्यात योजनेचे काम पूर्ण होईल असे आमदार ऋतुराज पाटील यांनी गतवर्षी जून महिन्यात जाहीर केले होते. सन २०२१ च्या दिवाळीची पहिली आंघोळ कोल्हापूर शहरवासियांना काळम्मावाडी पाणी योजनेच्या पाण्याने घालू असे वचन हसन मुश्रीफ यांनी दिले होते. ते पुरे न झाल्याने त्यांनी शहरवासीयांची माफी मागितली होती. करोना महामारीची परिस्थिती व तांत्रिक अडचणीमुळे योजना अपुरे असल्याचे खुलासा त्यांनी बैठकीत केला होता. तेव्हा त्यांनी मी २०२२ अखेर योजनेचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती. आता पालकमंत्री सतेज पाटील यांनी योजनेचे काम ८२ टक्के पूर्ण झाले असल्याने एप्रिल मध्ये योजनेचे काम पूर्ण होईल असे घोषित केले आहे. किमान उन्हाळ्यात तरी काळम्मावाडी योजनेचे पाणी मिळेल या अशी आशा नागरिकांमध्ये बळावली आहे.

विरोधकांचा आक्षेप

कोल्हापूरच्या नळ पाणी योजनेचा मुहूर्त सतत बदलत असल्याने त्यावर महापालिकेतील भाजप ताराराणी आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. जॅकवेल, इंटकवेल, ढासळलेली कोपर भिंत, कर्मचाऱ्यांची वानवा यामुळे योजना एप्रिल पर्यंत पूर्ण होणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी गटनेते अजित ठाणेकर यांनी केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: April to kolhapur kalammawadi piped water scheme akp
First published on: 28-01-2022 at 00:06 IST