कोल्हापूर : पुस्तकांची देवघेव इतपत मर्यादित काम न करता साहित्य सेवेला पूरक ठरणारे उपक्रम अव्याहतपणे राबवणाऱ्या आणि ज्ञानवर्धनाचे व्रत स्वीकारलेल्या इचलकरंजी येथील ‘आपटे वाचन मंदिरा’ने वाचनालयाच्या कामकाजाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. समाजातील विविध घटकांना कवेत घेत वाचनालयाची कक्षा रुंदावली आहे. कालानुरूप अद्यायावत सुविधा निर्माण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. यासाठी लाखमोलाच्या आर्थिक मदतीची निकड संस्थेला भासत आहे.

आपटे वाचन मंदिराने इचलकरंजीच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. वकील रामभाऊ आपटे यांनी स्वत:पुरते सुरू केलेले वाचनालय १८७० मध्ये ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’मध्ये बदलल्यापासून ते आता शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या आपटे वाचन मंदिराने वाचकांची ज्ञानलालसा भागवण्याचे काम निरंतरपणे चालवले आहे. दुर्मीळ ग्रंथांसह साहित्याचा मोठाच खजिना या ग्रंथालयाच्या संग्रही आहे. ५० वर्षांहून अधिक काळ चाललेली नामवंत वसंत व्याख्यानमाला, इंदिरा संत साहित्य पुरस्कार, मुले-महिलांसाठी उपक्रम, स्वतंत्र चित्र दालन, साहित्यिकांच्या वारसांनी विश्वासपूर्वक सुपूर्द केलेला वाङ्मयीन ऐवज असे भरीव उपक्रम चालवले जातात.

हेही वाचा >>>कोल्हापूर : प्रतापसिंह राणे यांच्याकडून महालक्ष्मीला ३० लाखांचे दागिने

८३ हजारांवर पुस्तके असणाऱ्या या ग्रंथालयात नव्याने काही गोष्टी करण्याचे नियोजन आहे. पुस्तक मांडणी जुन्या पद्धतीच्या लोखंडी रॅकमध्ये केलेली आहे. ऐवजी काळाशी सुसंगत ‘कॉम्पॅक्टर’ची रचना करण्याचे संचालक मंडळाने योजिले आहे. सुलभ पुस्तक हाताळणीची यंत्रणा राबवण्यासाठी ४० लाखांचा खर्च होणार आहे. बाल विभागात अद्यायावत फर्निचर, त्यांची सर्जनशीलता वाढवणारे उपक्रम यासाठी १५ लाखांचा खर्च होणार आहे. दुर्मीळ पुस्तकांचे अस्तित्व राहण्यासाठी डिजिटीकरण करणे तसेच स्थानिक लेखकांचे स्वतंत्र कक्ष यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च येणार आहे. वाचनालय हे शाळांमध्ये पोहोचावे यासाठी मोबाइल लायब्ररी सुरू करण्याकरिता १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. खेरीज, सौरऊर्जा प्रकल्प, जनरेटर, इंदिरा संत साहित्य पुरस्कार रकमेत वाढ .. खर्चाची यादी अशी वाढणारी आहे.

एकूणच ग्रंथालयांकडे येणारी वाचनाची संख्या कमी होत आहे. वेतनासह सर्व खर्च वाढत चालले आहेत. खर्चाच्या आवक- जावकचे गणित हाताबाहेर जात असताना शासकीय अर्थसाहाय्य मिळत नाही. अशा खडतर स्थितीत ज्ञानसेवेचे हे व्रत आणखी भक्कमपणे चालू राहण्यासाठी आपटे वाचन मंदिराच्या नियोजित उपक्रमांसाठी भरीव आर्थिक मदतीची गरज आहे. त्यातून साहित्यविषयक सेवा वाचकांपर्यंत अधिक सुलभपणे पोहचणे शक्य होणार आहे.