सोलापूर : रानवाटा तुडवत निसर्गाची गूढ भाषा मराठी मुलखाला उलगडून दाखवणारे दिवंगत अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या ज्ञानसाधनेचा समृद्ध ठेवा आता वाचकांसाठी खुला होत आहे. चितमपल्लींच्या जन्मभूमीत, सोलापुरात त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आस्थेने ‘अरण्यऋषी मारुती चितमपल्ली संदर्भ ग्रंथालय’ उभारले असून, येत्या ५ नोव्हेंबर रोजी चितमपल्ली यांच्या जन्मदिनी याचे लोकार्पण होत आहे. राज्यभरात ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पाळल्या जाणाऱ्या ‘पक्षीसप्ताहा’चे औचित्य साधून या ज्ञानयज्ञाची सुरुवात होत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते ५ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता या ग्रंथालयाचे उद्घाटन होणार आहे. याच सोहळ्यात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते चितमपल्ली यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणाऱ्या विशेष संकेतस्थळाचेही लोकार्पण होईल.
ग्रंथांचे दान नको, जतन हवे…
चितमपल्ली यांच्या पश्चात त्यांच्या समृद्ध ग्रंथभांडाराचे काय होणार, हा प्रश्न साहित्य वर्तुळात चर्चिला जात होता. विद्यापीठाकडे हा संग्रह सोपवण्याचे पर्याय पुढे आले होते; परंतु केवळ पुस्तकांचे गठ्ठे दान करण्यापेक्षा त्यांचे पावित्र्य आणि जतन टिकून राहावे, अशी चितमपल्लींची भावना होती. त्यांच्या या इच्छेचा आदर करत त्यांचे पुतणे श्रीनिवास चितमपल्ली आणि कुटुंबीयांनी स्वतः पुढाकार घेतला. सोलापुरात ५०० चौरस फुटांची जागा खरेदी करण्यात आली आणि कोणत्याही बाह्य मदतीविना स्वखर्चातून हे ग्रंथालय उभे राहिले.
वेदांपासून रोजनिशांपर्यंत दुर्मिळ खजिना
नागपूर आणि वर्धा येथून आणलेल्या सुमारे ६ ते ७ हजार ग्रंथांचा ठेवा येथे सज्ज करण्यात आला आहे. चार प्रमुख वेदांचा सखोल अभ्यास, संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीवांवरील दुर्मिळ पुस्तके हे या संग्रहाचे वैभव आहे. याशिवाय, चितमपल्ली यांनी विसाव्या-पंचविसाव्या वर्षापासून आयुष्याच्या अखेरपर्यंत रोज नित्यनेमाने लिहिलेल्या सुमारे ६० ते ७० हस्तलिखित दैनंदिनी येथे पाहायला मिळणार आहेत. या दैनंदिनी आणि ग्रंथांच्या मथनातूनच त्यांचे प्रसिद्ध निसर्गग्रंथ,
पक्षीकोश आणि आगामी ‘प्राणीकोश’ आकारास आले आहेत.
वाचकांसाठी नियमावली आणि विनामूल्य सुविधा…
अभ्यासक, लेखक आणि विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय पूर्णपणे विनामूल्य खुले राहील. एका वेळी १० वाचकांना बसून शांततेत संदर्भ तपासता येतील. पुस्तके जीर्ण होऊन खराब होऊ नयेत म्हणून ग्रंथ अथवा दैनंदिनी घरी नेण्यास सक्त मनाई असून छायाचित्रे काढता येणार नाहीत. ग्रंथालयाची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ८ अशी राहील.
जागतिक अभ्यासकांसाठी संकेतस्थळ..
दूरवरच्या अभ्यासकांना उपलब्ध संदर्भांची माहिती मिळावी म्हणून, अरण्यऋषींचे नातू बाळासाहेब चितमपल्ली विशेष संकेतस्थळ विकसित करत आहेत. महिनाभरात पुस्तकांची सूची त्यावर उपलब्ध होईल. पुढील टप्प्यात बारकोडिंग आणि अभ्यासकांच्या सहकार्याने दुर्मीळ संदर्भांचे डिजिटलायझेशन करण्याचे नियोजन आहे.
