कोल्हापूर : ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडच्या बुरुजाचा भाग पडल्याने आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पुरातत्व खात्याची खुर्ची, फर्निचर, फाइल्स हे प्रतीकात्मकरित्या दुतोंडी बुरुजावरून फेकून दिले. किल्ल्याचे संवर्धन न झाल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीसह फेकून देण्याचा इशारा देण्यात आला.

दरवर्षी पावसाळ्यात किल्ले पन्हाळगड तसेच अन्य किल्ल्यांचे बुरुज ढासळत असतात. याकडे इतिहासप्रेमी, सामाजिक संघटना यांनी लक्ष वेधूनही पुरातत्त्व विभागाकडून दखल घेतली जात नाही. याचा निषेध करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते पन्हाळगडावर आले. त्यांनी पुरातत्व कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे ठरवले होते. पण कार्यालयात शिपाई वगळता कोणीच नव्हते. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी तेथील खुर्ची, फर्निचर, फाइल्स घेऊन त्या दुतोंडी बुरुजावरून खाली फेकून दिल्या.

गेल्या पावसाळ्यात पन्हाळगडातील बुरुज ढासळत असल्याकडे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता चालवली जाते पण मोगलाई प्रमाणे किल्ल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. किल्ल्यांची दुरवस्था अशीच होत राहिली तर पुढील काळात अधिकाऱ्यांना खुर्चीसह दरीत बुरुजावरून फेकून दिले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.