सांगली : काशिलिंगाच्या नावानं चांगभलचा गजर करत धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीतील बिरोबाची यात्रा बुधवारी संपन्न झाली. यंदाच्या  यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील दोन लाखावर भाविकांनी हजेरी लावली. मंगळवारी मानाचा गोडा नैवद्य अर्पण करण्यात आल्यानंतर बुधवारी पहाटेपासून खारा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यानंतर यात्रेची सांगता झाली.  

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबाचे मुख्य  स्थान आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात याठिकाणी यात्रा भरते. मंगळवारी येळावीच्या गावडे कुटुंबाचा मानाचा गोडा नैवेद्य बिरोबाला अर्पण  करण्यात येतो. यानंतर सुर्याबा देवाला बकर्‍याचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो.

यात्रेेकरूंना आरेवाडी बनात  सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी आमदार रोहित पाटील व तासगावचे प्रभाकर पाटील यांनी टँकरची व्यवस्था केली आहे. तसेच यात्रा काळात करण्यात आलेल्या व्यवस्थेची तहसिलदार अर्चना कापसे यांनी जातीने  पाहणी केली.

यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्यासह  २०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरी-नागपूर महामार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर बिरोबा मंदिर असून महामार्गालगत वाहतूक कोेंडी होउ नये यासाठी वाहतूक नियंत्रण पथकही कार्यरत ठेवण्यात आले आहे. परिसरात मद्य विक्रीला तीन दिवस मनाई करण्यात आली आहे.

यात्रेकरूंन यात्रा काळात कोणताही त्रास होउ नये यासाठी यात्रा समितीचे अध्यक्ष काशिलिंग कोळेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, सचिव राहूल कोळेकर हे जातीने पाहणी करत असून विविध वस्तू विक्रीची दुकाने, घोंगडी, जेेन विक्रीबरोबरच बांगड्या विक्रीची दुकानेही यात्रेत लावण्यात आली आहेत.