सांगली : माणदेशातील साहित्यिक आणि आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असलेल्या ग. दि. मांच्या लेखनीतून उतरलेले आणि पु. ल. देशपांडे यांच्या संगीत साजाने नटलेले देवबाप्पा चित्रपटातील नाच रे मोरा नाच हे अजरामर बालगीत गाणारी सांगलीची कन्या आशा भोसले. बालगीतापासून पॉप गीतापर्यंत स्वर देणार्‍या स्वर सौदामिनी, सांगलीची कन्या आशाताई भोसले यांचा सांगलीकरांनी सव्वीस वर्षापुर्वी सांगली भूषण पुरस्कार देउन गौरव करण्यात आला होता.

आशाताईंचा जन्म सांगलीतील मंगेशकर चाळीत झाला होता. पंडित दीनानाथ मंगेशकर रंगमंच कलाकार, संगीताचा वारसा जन्मजात घेउन आलेल्या मंगेशकर कुटुंबाची हलाखीची स्थिती सांगलीत होती. लतादीदीसोबत शाळेत चोरून जात असताना शिक्षकांनी पकडले. एका फी मध्ये दोघींचे शिक्षण होउ शकत नाही म्हणून पंतोजीने वर्गाबाहेर हाकलले. मात्र, विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी मंगेशकर कुटुंबाने स्थलांतर केले. थोरल्या असलेल्या लतादिदींनी शिक्षण सोडले असले तरी आशाताईनी चौथीपर्यंत अक्षरओळख करून घेतली होती. शिक्षणात पुढे जाता आले नसले तरी गायन क्षेत्रात आपल्या आवाजाचा दबदबा त्यांनी निर्माण केला होता.

गदिमांनी लिहीलेल्या नाच रे मोरा या देवबाप्पा चित्रपटातील बालगीताने बालमनावर गारूड कायमचेच कोरले असले तरी आजही बिगरमोसमी पावसाचे आगमन होताच, अंगणात बागडणारी लहान पावले याच गाण्याच्या ओळी गुणगुणतात. मराठीसह विविध भाषामधून सुमारे १२ हजार गाणी गाणार्‍या आशाताईचा सांगलीशी कायमचा ऋणानुबंध राहिला आहे. सांगलीत आल्यानंतर आपले जन्म स्थळ शोधण्यात त्यांनी इतिहासाचे अभ्यासक आणि शिक्षक सदानंद कदम यांची मदत घेतली. लहानपणी जवळकीचे नाते असलेल्या मास्टर अविनाश यांच्याशीही नाते जपले होते. कृष्णाकाठी असलेली सांगली ही जन्मस्थळ असल्याचा आशाताईना अभिमान होता. बालपण जरी कोल्हापूर, पुण्यात गेले असले तरी सांगलीच्या मातीशी त्यांची नाळ जुळलेली होती.

नाच रे मोरा, आंब्याच्या बनात नाच यासारख्या बालगीतासोबतच लावणी, अभंग, पॉप गीते यांना वेगवेगळ्या ताणा देत गायकी दर्शवणार्‍या आशाताईंच्या स्वरांचा गौरव सांगलीकरांनी केला. दीनानाथ मंगेशकर यांच्या शताब्दी वर्षामध्ये विश्‍वजागृती मंडळाच्यावतीने ५ जानेवारी २००० रोजी संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या हस्ते तत्कालिन जिल्हाधिकारी नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सांगली भूषण पुरस्कार अरूण दांडेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रदान केला होता. यावेळी ह्दयनाथ मंगेशकर हेही आवर्जुन उपस्थित होते.
तसेच स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या शताब्दी महोत्सव सांगली महापालिकेने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. त्यावेळी मंगेशकर भावंडांचा मानपत्र देउन सांगलीकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला होता. सांगलीकरांनी सांगलीच्या कन्येचे कायम कौतुक तर केले आहेच, पण याचबरोबर त्यांच्या बालपणीच्या आठवणीही कायमच्या कोरल्या आहेत.
आपल्या नटखट आणि गीताला साजेशा आवाजाची जोड देत गीत सादर करणार्‍या आशाताई सांगलीचे भूषण तर होत्याच, पण संगीताच्या क्षेत्रातील एक अढळ तारा होत्या. भारती विद्यापीठाने कुलपती डॉ.पतंगराव कदम यांनी त्यांना डिलिट पदवी प्रदान केली होती. यावेळी त्या म्हणाल्या होत्या. चौथी शाळा झालेली मी आज डॉक्टर झाले याचा निश्‍चितच आनंद वाटतो.
000000