पंढरपूर : आषाढी एकाशी दिवशी महापूजेला अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) उपस्थित राहतात. त्यामुळे प्रशासनावर ताण पडतो. याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी यांनी याबाबत एक नियमावली तयार केली आहे. त्याला शासनाची मंजुरी मिळाली की अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींची संख्या मर्यादित होईल. तसेच यंदाची वारी यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. वारकरी, भाविकांना मागील वर्षीच्या वारीपेक्षा यावर्षीच्या वारीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.
येथील केपीबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी अनुषंगाने आढावा बैठकीत तेली- उगले मार्गदर्शन करत होत्या. तत्पूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुणे, सातारा सोलापूर जिल्ह्यातील पालखीतळ, रिंगण सोहळ्याचे ठिकाण आदी पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर पंढरपूर येथे बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त शीतल तेली उगले पुढे म्हणाल्या की, पालखीतळ, विसावा व मुक्कामाची ठिकाणे, पालखी मार्ग ज्या ग्रामपंचायती व नगरपालिकेच्या हद्दीत आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पालखी पुढे गेल्यानंतर पुढील चार ते पाच तासात त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली गेली पाहिजे. तसेच या ठिकाणी वारकऱ्यांना पुरेशी पाण्याची व्यवस्था करावी. तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी व तात्पुरती शौचालये दिवसातून किमान तीन ते चार वेळेस स्वच्छ केली पाहिजे. तसेच या ठिकाणी प्रकाशव्यवस्था, अग्नि प्रतिबंधक व्यवस्था, आरोग्य पथके व्यवस्था योग्य पद्धतीने ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आरोग्य यंत्रणेने वारी कालावधीत येणाऱ्या सर्व भाविकांना व वारकऱ्यांना ‘विटामिन ए’ व ‘विटामिन डी’ च्या गोळ्यांचा शंभर टक्के पुरवठा करावा.
वारीकाळात उजनी धरणातून पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करावे. नदीच्या दोन्ही बाजूला ‘वॉच टॉवर’ उभे करावेत व नदीपात्रात जाणाऱ्या भाविकांवर योग्य नियंत्रण ठेवावे. पोलीस विभागाने गर्दीवर नियंत्रणासाठी काळजी घ्यावी. पुरेसा बंदोबस्त ठेवावा, सर्व संबंधित विभागाने त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे आदेश आयुक्त तेली यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती दिली.
यावर्षी सीसीटीव्हीच्या माध्यमातून ‘हेड काउंटिंग’ करण्यात येणार आहे. तसेच ‘मल्टी ड्रोन’ वापर करून सुरक्षा यंत्रणा तसेच ‘हेड काउंटिंग’ही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दहा दिवस अगोदर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून अन्न व धान्याचे तसेच प्रसादाचे नमुने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी वारीच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत सादर केली.
