सोलापूर । पुणे, साताऱ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीतील ५० हजार वारकऱ्यांना ग्रामविकास मंत्रालयामार्फत रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रशासकीय सुविधांमध्ये दोन ते पाच पटीने वाढ करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे र आहे.पुणे आणि सातारा जिल्ह्यात पाऊस असला तरी सोलापूरमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र, आगामी काळातील पावसाची शक्यता गृहीत धरून ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार रेनकोट वाटपाचे नियोजन सुरू आहे. यंदा वारीसाठी सुमारे ३० लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज असून, त्यानुसार प्रशासनाने ६१ कोटी ५० लाख रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यात वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरती शौचालये, मोबाईल चार्जिंग व्हॅन आणि महिलांसाठी चेंजिंग रूम या सुविधांचा समावेश आहे. आरोग्य विभागामार्फत २,८२२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, दिंडी प्रमुखांना ४,५०० औषध किट्स (मेडिसिन किट्स) दिले जाणार आहेत. तसेच, महिला वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर १६७ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार असून, तिथे सॅनिटरी पॅड वेंडिंग व डिस्पोजल मशीन्स, पिण्याचे पाणी आणि पंख्यांची सोय असेल. याशिवाय वारी मार्गावर १० हजार वृक्षलागवडीचा मानसही प्रशासनाने व्यक्त केला आहे.
१२ लाख चौरस फुटांवर जर्मन हँगर…
पावसापासून वारकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी उभारण्यात येणाऱ्या जर्मन हँगर्सच्या क्षेत्रफळात यंदा मोठी वाढ करण्यात आली आहे. यंदा तब्बल १२ लाख चौरस फुटांवर (स्क्वेअर फूट) जर्मन हँगर उभारले जातील. मागील वर्षी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यात मिळून ५ लाख चौरस फुटांवर हे हँगर उभारण्यात आले होते.
वाळवंट स्वच्छतेसाठी ५० कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक
चंद्रभागेचा वाळवंट परिसर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी ५० कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेने ५ हजार मोबाईल टॉयलेट्स (फिरती शौचालये) उपलब्ध करून दिली आहेत.
