सोलापूर : आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून निघालेले संतांचे पालखी सोहळे आता अंतिम टप्प्यात आले असून, विठूरायाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर वैष्णवांचा मेळा विसावला आहे. गुरुवार (१६ जुलैपासून) या मानाच्या १० प्रमुख पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने आगमन होत असून, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. १६ ते २० जुलै दरम्यान या सर्व प्रमुख पालख्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामध्ये पहिली मानाची विठ्ठल रुक्मिणी संस्थानची (कौंडिण्यपूर) पालखी गुरुवारी (१६ जुलै) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज, स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती

पालखी सोहळ्यासोबत येणार्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने सुरक्षा, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि आपत्कालीन सेवांची जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या सूचनेनुसार, प्रत्येक पालखीचे स्वागत, समन्वय आणि मुक्कामाच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्यासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

असे असेल पालख्यांचे आगमन आणि मुक्काम:

  • १६ जुलै: विठ्ठल रुक्मिणी संस्थान (कौंडिण्यपूर) – धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात (पाथरी, ता. बार्शी) प्रवेश व पहिला मुक्काम.
  • १७ जुलै: संत गजानन महाराज (शेगाव) – तामलवाडीमार्गे सोलापूर जिल्ह्यात (उळे, ता. दक्षिण सोलापूर) आगमन व मुक्काम.
  • १८ जुलै: संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर) – रावगावमार्गे (ता. करमाळा) प्रवेश आणि करमाळा शहरात मुक्काम.
  • १९ जुलै: संत ज्ञानेश्वर महाराज माउलींसह (आळंदी) चार पालख्यांचे आगमन होईल.
  • १९ जुलै – संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर) पालखीचे भारद्वाडी फाटामार्गे आगमन व माढा शहरात मुक्काम, तर संत एकनाथ महाराज (पैठण) पालखीचे मुंगशीमार्गे आगमन व बिटरगाव येथे मुक्काम असेल.
  • २० जुलै: संत तुकाराम महाराज (देहू) पालखीसह तीन पालख्यांचे आगमन होईल. तुकाराम महाराजांची पालखी सराटी येथील मुक्काम संपवून अकलूज शहरात दाखल होईल.

-२० जुलै -संत सोपान महाराज (सासवड), संत चांगवटेश्वर देवस्थान (सासवड) आणि संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर) यांच्या पालख्यांचेही यावेळी आगमन व अकलूज- टेंभुर्णी भागात मुक्काम असेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी प्रांताधिकारी बी. आर. माळी, संत तुकाराम महाराज पालखीसाठी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तर संत निवृत्तीनाथ महाराज पालखीसाठी सहआयुक्त आशिष लोकरे यांच्यासह इतर प्रमुख पालख्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.