कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सरसकट दुकाने सोमवारी सुरू करण्याचा निर्धार सराफ व्यावसायिकांच्या संघटनेने घेतला आहे. तर, प्रशासनाचा निर्णय पाहून पुढील दिशा ठरवण्याची सावध भूमिका कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने ठेवली आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्याबाबत उद्या नेमके काय होणार यावरून सायंकाळपर्यंत संदिग्धता कायम राहिली.

कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरू करण्यासाठी गेल्या आठवडय़ात व्यापारी रस्त्यावर उतरले होते. रविवारी रात्री पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवार ते गुरुवार दुकाने उघडण्यास मुभा असल्याचे घोषित केले होते. ही मुदत शुक्रवारी संपली आहे. शनिवार व रविवार हे दोन कडक टाळेबंदीचे दिवस होते. दुकाने सुरू करण्याचा निर्णय कायम राहणार की काय याबाबत अद्याप संदिग्धता होती. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने काल प्रभारी जिल्हाधिकारी महापालिकेच्या प्रशासक, डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देऊन परवानगी पुढे कायम सुरू ठेवावी अशी मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. त्यानंतर चेंबरची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी रविवारी सांगितले.

सराफ संघटना आक्रमक

सराफ व्यापारी संघामध्ये रविवारी बैठक होऊन सराफ व्यवसायसह सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार यांनी सांगितले. बाजार आणि इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय असेल, तर सर्व प्रकारच्या दुकानाचा बाजारही बंद करावा. अन्यथा सर्व दुकाने उघडून असा इशारा त्यांनी आज दिला.