सांगली :  आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवारातील आधुनिक पणन संकुल येथे भरलेल्या डाळिंब सौदे बाजारात तब्बल  ३०० टन डाळिंबाची विक्रमी आवक झाली. व्यापार्‍यांमधील चुरशीच्या स्पर्धेमुळे डाळिंबाला प्रतिकिलो किमान १० रुपये ते कमाल १३१ रुपये असा दर मिळाला. डाळिंबासोबत ड्रॅगन फ्रुटची एक टन आवक झाली असून त्याला प्रतिकिलो १० ते ५५ रुपये असा बाजारभाव मिळाला.

आटपाडी बाजार समितीचा डाळिंब सौदे बाजार हा पश्चिम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांसाठी विश्वासार्ह बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे आटपाडी, खानापूर, जत, सांगोला, माण, खटाव, पंढरपूर, माळशिरस, इंदापूर या तालुक्यासह अहिल्यानगर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातील अनेक भागांतून शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर डाळिंब विक्रीसाठी आणले होते दर्जानुसार पारदर्शक लिलाव प्रक्रिया राबविण्यात आल्याने व्यापार्‍यांमध्ये चांगली स्पर्धा निर्माण झाली आणि त्याचा थेट लाभ डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना मिळाला.

डाळिंब सौदे बाजारातील लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली. प्रत्येक डाळिंब लॉटची प्रत्यक्ष पाहणी करून व्यापार्‍यांनी स्पर्धात्मक बोली लावली. त्यामुळे दर्जेदार डाळिंबाला उच्चान्की की दर मिळाले, तर मध्यम व सामान्य दर्जाच्या डाळिंबालाही समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.  

आटपाडी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी म्हणाले की, आटपाडी बाजार समितीचा डाळिंब सौदे बाजार हा शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देणारा असून प्रत्येक डाळिंब उत्पादकाला स्पर्धात्मक दर मिळावेत, यासाठी बाजार समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. परिसरातील शेजारील तालुके, जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांनी आपला डाळिंब माल आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात विक्रीसाठी आणून पारदर्शक लिलावातून मिळणार्‍या उच्चांकी दराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.