विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस वाढल्यामुळे रविवारी मतदारांना सहलीवर पाठविण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. तर, शिवसेनेच्या ४० मतदारांचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे सतेज पाटील व बंडखोर आमदार महादेवराव महाडीक यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. मतदार मोजके असल्याने प्रत्येक मताला मोल आले आहे. जिल्ह्यातील दहा नगरपालिकांचे विषय समिती निवडी पार पडल्यामुळे आता नगरसेवकांना सहलीवर नेण्यासाठी दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू आहेत. मतदारांच्या मागणीकडे लक्ष देऊन त्यांना राजी केले आहे. परिणामी आता नगरसेवक स्वतहून सहलीला जाण्यासाठी तयार झाले आहेत. इचलकरंजीतील राष्ट्रवादीचा एक गट पक्षाचा आदेश डावलून महाडीक यांच्यासोबत गेल्याने पक्षात दुफळी निर्माण झाली असून ती सतेज पाटील यांना त्रासदायक ठरत आहे.
शिवसेनेकडे लक्ष
शिवसेनेची बठक झाल्यानंतर खासदार विनायक राऊत म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्यानुसारच मतदान होईल. भाजपचा अधिकृत उमेदवार असता तर आम्ही आघाडी धर्मानुसार यापूर्वीच पािठबा जाहीर केला असता. महाडीक हे अधिकृत उमेदवार नसल्याने प्रत्येकाशी चच्रेनंतरच निर्णय घेतला जाईल.
महाडीक देणार पक्षाला उत्तर
पक्ष निलंबनाच्या कारवाईची नोटीस मिळताच पक्षाला योग्य ते उत्तर देणार असल्याचे आमदार महादेवराव महाडिक यांनी स्पष्ट केले.  काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात आमदार महाडिक यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी पक्षातून मागणी झाल्यानंतर महाडिक यांना निलंबित केल्याचे जाहीर केले. याबाबत आमदार महाडिक म्हणाले, कोणत्याही कारवाईचे पत्र अद्याप मला मिळालेले नाही. कारवाईची नोटीस मिळताच पक्षाला योग्य उत्तर देऊ. तर, निलंबन कारवाईची नोटीस प्रदेश सरचिटणीस अॅड. पाटील यांनी थेट सतेज पाटील यांच्याकडे दिल्याने याबाबत चर्चा सुरू होती.