कोल्हापूर : अयोध्या हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. जो तो दौऱ्यावर निघाला आहे. राज्य-देशातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप तसेच आहेत. ते सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना आजवर अपयश आले आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष वळवण्यासाठी अयोध्या, भोंगा, हनुमान चालिसासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची भूमिका सध्या घेतली जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सध्या होऊ घातलेले आयोध्येचे विविध पक्षनेत्यांचे दोरे, आंदोलनावर टीकास्त्र सोडले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंगळवारी पवार बोलत होते.

भाजप, शिवसेनेपाठोपाठ आता मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेतेही आयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. या एकूणच बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना पवार यांनी वरील टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की अयोध्या हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. माझा नातूही काल आयोध्यामध्ये होता. जो तो दौऱ्यावर निघाला आहे. पूर्वी लोकांच्या प्रश्नासाठी चळवळी होत होत्या. अयोध्या, भोंगा. हनुमान चालिसा वगैरे गोष्टी होत नव्हत्या. सामान्य लोकांचे प्रश्न बेकारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे प्रश्न बाजूला असतानाच आयोध्याचे काय झाले, प्रार्थना म्हणा असे निर्थक प्रकार सुरू झाले आहेत. 

आगामी निवडणुका लढवण्याबाबत एकमत नसल्याचे सांगत पवार म्हणाले, की एका गटाचे म्हणणे आहे की आपण एकत्र सत्ता चालत असल्याने एकत्रित मिळून निवडणूक लढवू. तर दुसऱ्या गटाने पक्ष चिन्हावर निवडणूक लढवू आणि निकालानंतर एकत्र येऊ, असा मतप्रवाह ठेवला आहे. एकमेकांची मते जाणून घेतल्यानंतर यावर जाहीरपणे बोललेले बरे, असेही त्यांनी स्पष्ट केले.