सांगली : सांगली व मिरज शहरात गुरूवारी बकरी ईद साजरी करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर गोवंश पशूच्या मांसाची वाहतूक होउ नये यासाठी कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ येथे पोलीसांचा गेले दोन दिवस जागता पाहरा ठेवण्यात आला आहे. तसेच ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहरात पोलीसांनी पथसंचलन केले. तर मुस्लिम गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मिरजेतील जनावरे बाजारात गोवंश संरक्षणासाठी जागृती फेरी काढत विक्रीस आणलेली गोवंश पशू परत पाठविण्यात आले.
गुरूवारी सांगली व मिरज शहरात बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरात खीर कुर्मा करण्यासाठी लागणार्या साहित्य विक्रीची दुकाने बाजारात लावण्यात आली असून आज दिवसभर साहित्य खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी झाली होती. मिरजेतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर दुकाने थाटली असून शेवया, ड्रायफ्रूट खरेदीसाठी आज गर्दी होती.
दरम्यान, ईद निमित्ताने कर्नाटकातून गोवंश पशूंची आवक होउ नये, तसेच कोणत्याही प्रकारच्या मांसाची वाहतूक होउ नये यासाठी म्हैसाळ ते कागवाड मार्गावरील सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकातून येणार्या वाहनांची तपासणी या ठिकाणी केली जात असून दिवसरात्र या ठिकाणी पहारा ठेवण्यात आला आहे.
ईदच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील प्रमुख मार्गावरून अधिक्षक श्री. दोशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे पथसंचलन करण्यात आले. या पथ संचलनामध्ये मिरज शहरासह मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, महात्मा गांधी पोलीस ठाणे, कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्यासह अप्पर अधिक्षक कल्पना बारवकर, उप अधिक्षक प्रणिल गिल्डा सहभागी झाले होते. तसेच गृहरक्षक दलाचे जवानही सहभागी झाले होते. महाराणा प्रताप चौकामध्ये यावेळी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
मुस्लिम गोरक्षक दल सांगलीच्या कार्यकर्त्यांनी आज मिरज जनावर बाजारातून गायी व बैलांची मुक्तता करत गोसंवर्धन आणि संरक्षणाचा संदेश दिला. पशू खरेदी-विक्रीसाठी आलेल्या बांधवांना गुलाब पुष्प देत, शासकीय नियमांची माहिती सांगत आणि शांततेत प्रबोधन करत गोवंश खरेदी-विक्री रोखण्याचे कार्य करण्यात आले. गाय ही राष्ट्रीय पशू म्हणून घोषित झालीच पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गायीचे दूध हे पृथ्वीवरील अमृत मानले जाते आणि भारतीय संस्कृतीतील पावित्र्य, सेवा व संवर्धनाचे प्रतीक असल्याचे मतही मांडण्यात आले.
मुस्लिम गोरक्षक दलाचे आसिफभाई बावा, युनूस महात, सलीमभाई पन्हाळकर, मुद्दसर मुजावर, अक्रमभाऊ शेख, हंजल बावा, रफीक महात, मौलाना इरशाद शेख, टिपु इनामदार, सुरज तांबोळी, मोहसीन शेख, समीर मालगावे, वाहिद कुरणे, शकील काझी, हैदर पठाण आदी कार्यकर्त्यांनी गांधीगिरीने प्रबोधन केले.
