कराड : पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र, शहीद जवान बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४१) यांच्यावर शनिवारी दुपारी १२ वाजता पिंपळोशीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सैन्य दल व पोलीस दलाकडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे.
शहीद बाळकृष्ण निकम यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. ‘शहीद बाळकृष्ण निकम अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.
सिक्कीम राज्याच्या अतिदुर्गम डोंगरात सीमारेषेवर जवान बाळकृष्ण निकम हे राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य बजावताना, प्राणवायूच्या कमतरतेमुळे बुधवारी (दि. ११) दुपारी शहीद झाले. त्यांचे पार्थिक चौथ्यादिवशी शनिवारी सकाळी पाटणमध्ये दाखल झाले. फुलांनी सजवलेल्या सैन्यदलाच्या ट्रकमधून पर्थिवाची पाटण ते मूळगावी पिंपळोशीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे घरी पार्थिव येताच कुटुंबाने केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. सैन्यदल व पोलीस दलाने अखेरची मानवंदना देताच पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, भाजपचे स्थानिक नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. सियाचीन, लडाखसारख्या अतिसंवेदनशील भागात बाळकृष्ण निकम यांनी दीर्घकाळ देशसेवा केली.
सध्या सिकीममधील शेरावानी परिसरात दोन हजार मीटर उंचीवरील अतिदुर्गम डोंगराळ भागात ८० किलोमीटर लांबीच्या सीमारेषेवर ते बिनतारी संदेशचालक म्हणून सेवा बजावत होते. परिसरात प्राणवायुची पातळी कमी असल्याने शरीराला त्याची कमतरता भासल्याने त्यांचे निधन झाले. सांगली येथून ते सन २००३मध्ये सैन्यदलात भरती झाले. त्यांची २३ वर्षे राष्ट्ररक्षणाची सेवा झाली. पुढील वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. तोपर्यंत त्यांच्यावर काळाने घाला घातला.
