सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील  बार्शी तालुक्यातील चारे शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ‘मेजर पापा’ यांची म्हैस ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे चारे व लगतच्या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढवली आहे.

धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या अनेक दिवसांपासून हिंस्र वन्यजीवांचा वावर वाढला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून निघालेला एक वाघ धाराशिवच्या रामलिंग-येडशी अभयारण्यात दाखल झाला होता. त्यावेळी परिसरात शेळ्या, गायी आणि म्हशींवर हल्ले वाढल्याने वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्या तपासणीदरम्यान बिबट्या किंवा लांडगा-तरसाऐवजी थेट वाघाचेच अस्तित्व समोर आले होते.

त्यानंतर या वाघाचा वावर येडशी अभयारण्यासह बार्शी तालुक्यातील चारे, कारी आणि वैराग शिवारातही दिसून आला. गतवर्षी पाळीव जनावरांच्या झालेल्या शिकारीपोटी वन विभागाने पशुपालकांना नुकसानभरपाई दिली होती. मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांपासून हा वाघ परिसरातून दिसेनासा झाला होता. काही दिवसांपूर्वी तो वाघ बीड, लातूर परिसरातील बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये असल्याचे पुन्हा एकदा ट्रँप कँमेर्यात आढळले आहे. त्यामुळे, येडशी अभयारण्य लगतच्या गावात आता म्हशीवरील ताज्या हल्ल्यानंतर हा वाघ पुन्हा परतल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे.

दरम्यान, चारे येथील म्हशीवरील हल्ला हा वाघाने नव्हे, तर बिबट्यानेच केल्याचे बार्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीला बडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या पट्ट्यात हिंस्र श्वापदांचा नियमित संचार आहे. तसेच, वाघ लवकरच पुन्हा माघारी येण्याची नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून गस्त वाढवली आहे. शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे मोकळ्या जागेवर न ठेवता सुरक्षित, बंदिस्त गोठ्यात बांधावीत आणि रात्रीच्या वेळी शेत-शिवारात एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.