कोल्हापूर : मराठी भाषिकांच्या भावनांचा अनादर करून १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्याची स्थापना केल्याने बेळगावसह सीमा भागामध्ये हा दिवस दरवर्षी काळा दिन म्हणून साजरा केला जातो. याची तयारी बेळगावसह सीमा भागांमध्ये मराठी बांधवांनी जय्यतपणे केलेली आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिवस यंदाही व्यापक स्वरूपात आणि शांततापूर्ण मार्गाने पाळण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. बेळगाव शहराचे माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध नोंदविण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समितीच्या माध्यमातून विविध भागांत आंदोलनाची माहिती पोहोचवून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला. काळा दिवस पूर्ण ताकदीने, शिस्तबद्ध, शांततापूर्ण मार्गाने पाळण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्यांना व कार्यकर्त्यांना रविवारी (ता. १ नोव्हेंबर) बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

पोलिस अधीक्षक यांनी ३० ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या अहवालानुसार एक नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवानिमित्त शिवसेना (उबाठा गट) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय शामराव देवणे हे सुमारे २५ महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना कार्यकर्त्यांसह निपाणीमार्गे बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रस्तावित काळादिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली आहे.

निपाणी-कोगनोळी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर असून कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. संबंधित नेते व कार्यकर्त्यांच्या संभाव्य दौऱ्यादरम्यान कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून प्रक्षोभक भाषणे किंवा विधाने होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यावेळी विजय देवणे, संजय पवार, सुनील मोदी, सुनील शिंत्रे, विशाल देवकुळे, मंजित माने आणि नेत्यांसोबत येणारे इतर समिती व शिवसेनेचे कार्यकर्त्यांना प्रवेश बंदी घातली आहे.