कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ बेळगाव येथे काळा दिन पाळण्यासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच अडवले. यावेळी शिवसैनिक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री उडाली. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह कोल्हापुरातील शिवसैनिकांना कर्नाटक प्रवेश बंदी घालण्यात आली होती.
दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकार कर्नाटक राजोत्सव साजरा करते. तर सीमा भागातील मराठी भाषिक हा दिवस काळा दिन म्हणून पाळतात. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या बेळगाव प्रवेशावर दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्बंध घातले होते. सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
शिवसेनेचे कार्यकर्ते बेळगावकडे कूच करत असतानाच कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. आणि बेळगावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. यावेळी झालेल्या झटापटीत वातावरण तणावपूर्ण बनले होते. यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिवसेनेचे विजय देवणे, विराज पाटील, प्रकाश पाटील, राजू यादव, विनोद खोत, साताप्पा नरके, अवधूत साळोखे, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, दिपाली घोरपडे, विशाल देवकुळे, सागर पाटील, विकास पाटील, सतीश पाणारी, सरदार टिप्पे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे सीमाभागात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.
