कोल्हापूर : सीमा प्रश्नाची धग कधीचीच संपली आहे. कसली ती काळी फेरी? त्यात ३०० तरी लोक सहभागी होतात का, अशा कुत्सितपणे कन्नड भाषिक संघटनांनी बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषकांना डिवचले होते. परंतु रविवारी बेळगावात निघालेल्या काळा दिनाच्या फेरीमध्ये हजारो मराठी भाषकांनी उतरत कन्नडिगांची तोंडे बंद करीत सीमाप्रश्न आजही तितकाच ज्वलंत असल्याचे दाखवून दिले.
भाषावार प्रांत रचना करताना ८६५ गावे मराठी भाषिक गावे कर्नाटकात घुसडण्यात आली. त्यामुळे १ नोव्हेंबर या कर्नाटक स्थापनेच्या दिवशी बेळगाव सह सीमाभागात काळा दिन दरवर्षी साजरा केला जातो. त्यातून महाराष्ट्रात सहभागी होण्याची इच्छा ताकतीने व्यक्त केली जाते. याही वर्षी त्याची तयारी सुरू असताना बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या एका बैठकीत वेळी कन्नड भाषिक संघटनांनी काळा दिन फेरीला अल्प प्रतिसाद मिळत असल्यावरून हिणवले होते. परंतु, आज हजारो आबालवृद्धांनी बेळगावच्या रस्त्या रस्त्यावर, चौका चौकात उतरून मराठी भाषकांच्या भगव्या झेंड्याची आणि एकतेची ताकद दाखवून दिली. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.
भाषावार प्रांतरचनेवेळी इच्छे विरुद्ध जबरदस्तीने कर्नाटकात घुसडण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे एक नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांकडून कडकडीत काळा दिन पाळुन, केंद्र आणि कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. बेळगाव,बिदर, भालकी,निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… बेळगावी नाही बेळगावचं….,रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे…अशा घोषणा देत, हजारों -च्या संख्येने एकवटलेल्या मराठी भाषिकांनी गेल्या ७० वर्षांपासून आजही ८६५ मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात येण्याचा निर्धार कायम असल्याचे ठणकावून सांगितले.
काळे ध्वज घेऊन आणि काळी वस्त्रे घालुन, मुक सायकल फेरीने सीमाभाग दणाणून गेला होता. विशेष म्हणजे मराठी भाषिक चळवळीच्या या लढ्यात आता चौथी पिढी सक्रिय झाली असतानाच,आजच्या मुकफेरीत पाचवी पिढीही उतरल्याचे दिसून आले.
यंदाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून या मूक सायकल फेरीस सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत गल्लीबोळातून मराठी भाषकांचे जथ्थे च्या जथ्थे सहभागी होताना दिसत होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून आलेल्या या भव्य रॅलीचा समारोप मराठा मंदिर येथे सभेने झाला.यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर तसेच माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मार्गदर्शन करताना,आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने धडपडत आहेत.कानडी अत्याचारा -च्या वरवंट्याखाली अन्याय सहन करत लढा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अजूनही निर्णय होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात पुन्हा सामील होण्यासाठी सीमावासियांचे प्राण आतुरले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
