कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांकडून आज मराठी भाषकांच्या समस्या मागण्या, सर्वोच्च न्यायालयातील कामकाजासंदर्भात माहिती घेतली आहे. समितीच्या वतीने मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले असले तरी आपण त्यांना आंदोलन करू नये अशी विनंती केली आहे. लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली जाईल. त्याचबरोबर बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर जबरदस्ती करण्यात येऊ नये यासाठी आपण कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी जातीने संपर्क साधू विनंती करणार आहोत, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बेळगाव येथे रविवारी पत्रकार दिली.
मंत्री सामंत हे बेळगाव येथे कुणबी समाज बांधवांच्या कार्यक्रमाला आले असता आज रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, आज मी या ठिकाणी समाज बांधवांच्या कार्यक्रमासाठी आलो आहे.कुणावर टीका करण्यासाठी नाही.सीमाप्रश्नाची आणि येथील मराठी भाषकांच्या समस्यांची शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगली जाणीव आहे. सीमा आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. याची बेळगावातील मराठी भाषिकांनाही पुरेपूर माहिती आहे. शिंदे यांच्या बाबत मराठी भाषकांच्या मनात अत्यंत आदराची भावना असल्याचेही आज प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या मागण्या संदर्भात मुंबईला गेल्याबरोबर मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची लवकरच बैठक व्हावी यासाठी जातीने प्रयत्न करेन.
बेळगाव येऊन वादग्रस्त वक्तव्य करून येथील मराठी भाषिकांना त्रास होईल असे काहीही बोलणार करणार नाही. लोकशाही पद्धतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली जाईल. बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर जबरदस्ती करू नये अशी विनंती करू. यासाठी दोन्ही राज्यांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
बेळगाव सीमा प्रश्नसंदर्भात महाराष्ट्र शासनाने नेमलेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई हे दोन्ही समन्वय मंत्री बेळगाव येथील मराठी जनतेला येऊन भेटत नाहीत. याकडे लक्ष वेधले असता मंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्र शासनाने सीमा समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली आहे. या मंत्र्यांना नजीकच्या काळात बेळगावला मी स्वतः जातीने घेऊन येणार आहे. त्याचबरोबर कर्नाटकात असलेल्या छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहे. समाधी स्थळाचा जीर्णोद्धार आणि विकास करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेळगावातील स्वागताने आनंद
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी बेळगावला भेट दिली. त्यांचे मराठी भाषकांनी स्वागत केले. या भेटीवर मंत्री सामंत यांनी एक्स वर प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामध्ये सामंत यांनी म्हटले आहे की, आज बेळगाव भेटीदरम्यान ‘महाराष्ट्र एकत्रीकरण समितीच्या’ वतीने करण्यात आलेल्या आपुलकीच्या सत्काराने मन भारावून गेले. सीमाभागातील मराठी अस्मिता आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकत्रीकरण समितीने अविरतपणे दिलेला लढा आणि केलेले कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. हा सत्कार म्हणजे केवळ माझा सन्मान नसून, महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी भाषिकांमधील घट्ट नाते अधोरेखित करणारा क्षण आहे. सीमाभागातील मराठी माणसाची अस्मिता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
