कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून निवेदन देण्यासाठी निघालेल्या बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये रोखले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनास्थळी कर्नाटकचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. यामुळे शाह यांना भेटून भूमिका मांडण्याची एकीकरण समितीची संधी हिरावली गेली आहे.
कर्नाटक राज्य शासनाकडून बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावांमध्ये अन्यायकारक वागणूक दिली जाते. सीमाभागातील मराठी बांधवांनी महाराष्ट्र राज्यामध्ये समाविष्ट होण्याची भूमिका गेल्या सहा दशकाहून अधिक काळ संघर्षमयरित्या मांडण्यास सुरुवात केली आहे. परंतु अलीकडच्या काळात कर्नाटक शासनाकडून बेळगावतील मराठी भाषिक जनता, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची जाणीवपूर्व अडवणूक केली जात आहे.
कर्नाटक शासनाकडून होणाऱ्या या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, मनोहर किनेकर, मालोजी अष्टेकर, अंकुश केसरकर, शुभम शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते आज सकाळी बेळगाव मधून निघाले होते. ते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हट्टरगी टोल नाक्याजवळ पोहोचले. तेथे आधीपासून आलेल्या कर्नाटक पोलिसांनी त्यांची वाहने अडवली. या सर्वांनी कोल्हापुरात जाण्यापासून रोखण्यात आले.
या प्रकाराकडून महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, अन्यायी कर्नाटक सरकारच्या निषेध असो अशा घोषणा दिल्या. यावेळी बेळगावचे पोलीस उप आयुक्त नारायण बारमनी, जावेद शिरापुरेसह पोलिसांची कुमक मोठ्या संख्येने उपस्थित होती. याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक राज्य शासनाकडून होणाऱ्या अन्यायाची माहिती देऊन मराठी भाषकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करणार होतो. परंतु महाराष्ट्र हद्दीत जाण्यापूर्वीच कर्नाटक पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते, कार्यकर्त्यांना अडवण्यात आले आहे. याबाबत चौकशी केली असता आम्हाला असे सांगण्यात आले की कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बेळगावातील कोणाही आंदोलकांना कोल्हापूरपर्यंत पाठवू नये; याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे कळवले होते.
त्यानुसार कर्नाटक प्रशासन व पोलिसांनी आम्हाला कर्नाटक हद्दीत रोखून अडवणूक केली आहे. तथापि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची एक तुकडी कोल्हापूरकडे या आधीच रवाना झाली आहे. दीड तास झाले तरी अजूनही आम्हाला या टोलनाक्याजवळ रोखून धरले आहे. हा मराठी भाषेत बांधवांच्या लढ्याला रोखण्याचा अन्यायकारक प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.
कोल्हापुरात काय ठरले होते?
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची इच्छा गेल्या आठवड्यात व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्यावेळी शाह यांची भेट घडवून आणावी, यासाठी मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेतली होती. त्यांना भेटीसंदर्भात निवेदन सादर केले होते. यावेळी बाजार समितीचे माजी सदस्य महेश जुवेकर, श्रीकांत कदम, राजू पाटील, आशिष कोचेरी, उमेश पाटील, संतोष कृष्णाचे उपस्थित होते.
शहांचा पुढाकार
अमित शाह यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चार वर्षांपूर्वी महत्वाची भूमिका घेतली होती. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नी कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, त्यासाठी दोन्ही राज्यातील प्रत्येकी तीन मंत्र्यांची संयुक्त समिती स्थापन करावी. त्यांची बैठक घेऊन अहवाल सादर करावा. सीमाभागावर देखरेख करण्यासाठी केंद्राचा अधिकारी नेमावा, असा आदेश पारित केला होता. दरम्यान दोन्ही राज्यातील निवडणुकानंतर ही समितीही स्थापन झाली नाही आणि अधिकारीही नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे, या प्रश्नावर शाह यांनी पुन्हा लक्ष घालावे, यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार होती.
