सांगली : तंबाखू, गुटखा आहे का? असे विचारत ईश्वरपूर परिसरात वृद्ध व्यक्तीची फसवणूक करून हातोहात सोनसाखळी व अंगठी लंपास करणाऱ्या कर्नाटकातील सराईत संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील दोन अज्ञात आरोपी मोटारसायकलवरून ईश्वरपूरमधील एका दुकानाबाहेरील टपरीजवळ आले होते. त्यांनी फिर्यादीला “तंबाखू, गुटखा आहे का?” अशी विचारणा केली. फिर्यादीचे वय अधिक असून त्यांना कमी ऐकू येत असल्याचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी व उजव्या हातातील अर्धा तोळ्याची खडा असलेली सोन्याची अंगठी नकळत काढून घेतली आणि तेथून पसार झाले होते.

या घटनेनंतर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकातील पोलीस हवालदार सागर लवटे व अरुण पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, सांगलवाडी जुना टोल नाका ते बायपास रोड परिसरात कर्नाटकमध्ये नोंदणीकृत असलेल्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवर एक संशयित फिरत आहे.

पथकाने सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव इक्बाल हिम्मतलाल बेग (वय ५९, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात १६.५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व अंगठी, तर उजव्या खिशात ३०० रुपये रोख रक्कम आढळून आली. तसेच त्याच्याकडील मोटारसायकलसह एकूण ३ लाख २० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपीने तीन महिन्यांपूर्वी ईश्वरपूर येथे त्याचा साथीदार हैदर नजरू ईराणी याच्यासह मोटारसायकलवरून येऊन चोरी केल्याची कबुली दिली.

जप्त मुद्देमाल व आरोपीला पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वीही मालमत्तेविषयक गुन्हे दाखल आहेत.