सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ८२ हजार क्युसेक आणि वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (दि.३१) दुपारी चार वाजता सोडण्यात आला आहे. नरसिंगपूर येथील संगमावर भीमा नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग तब्बल दीड लाखापर्यंत पोहोचल्याने भीमा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली असून, नदीकाठच्या व्यास-नारायण झोपडपट्टीतील रहिवाशांना स्थलांतरित होण्यासाठी सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

धरणे शंभर टक्के भरल्याने विसर्गात वाढ

पुणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे मागील आठवड्यात उजनी धरण शंभर टक्के भरले. पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरुवातीला १० हजार क्युसेक असलेला विसर्ग शुक्रवारी सायंकाळी ८२ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. दुसरीकडे, १५ दिवसांपूर्वीच १०० टक्के भरलेल्या वीर धरणाच्या लाभक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथूनही शुक्रवारी ६३ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.

२३ पैकी २० बंधारे पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर विसर्ग दीड लाखाच्या पार गेल्यामुळे भीमा नदीवरील २३ पैकी २० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील नदीकाठच्या गावांना बसला आहे.

प्रशासन सतर्क; एनडीआरएफ तैनात

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पंढरपूरमध्ये ‘एनडीआरएफ’चे ३० जवानांचे पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ५० जवान तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.

पिण्याचे पाणी अन् आरोग्याचा प्रश्न

नळपाणी पुरवठा योजनांच्या विहिरी व पंपहाऊस पाण्यात गेल्याने भीमा नदीकाठच्या छोट्या गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तेथे पर्यायी पाण्याची सोय करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी सांगितले. तसेच, पूरकाळात व पूर ओसरल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असे, जिल्हा परिषद आरोग्य विभागतर्फे सांगण्यात आले.

नागरिकांनी खबरदारी बाळगावी: तहसीलदार

वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात पोहोचण्यास ४० तास, तर उजनीचे पाणी पोहोचण्यास १५ तास लागतात. यामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगून सतर्क राहावे, असे आवाहन पंढरपूरचे तहसीलदार सचिन लुंगटे यांनी केले आहे.