दयानंद लिपारे, लोकसता 

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असताना या आखाडय़ात पुन्हा एकदा जिल्ह्यातील मातब्बर अशा पाटील विरुद्ध महाडिक लढत रंगणार आहे. दोन्ही बलाढय़ घराण्यातील लढत असल्याने ती प्रतिष्ठेची होणार आहे. राजकारणातील आजवरच्या यश व अपयशाचे हिशोब पूर्ण करण्याची खासी संधी दोन्ही कुटुंबांना आली आहे. जोडीलाच महाविकास आघाडी विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाचा मुकाबला म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होत आहे. काँग्रेसचे सतेज पाटील हेच उमेदवार असणार हे निश्चित आहे. गतवेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवताना शिवसेनेची मदत घेतली होती. यावेळी ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरले असल्याने आघाडीचे बळ त्यांना लाभले आहे. 

पाटील यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याबरोबरच निवडून जिंकण्याचा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी व्यक्त केला होता. भाजपच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे ही प्रबळ नावे प्रामुख्याने भाजपकडून चर्चेत होती. भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पाठोपाठ महाडिक परिवाराने जिल्ह्यात मतदारांशी संपर्क वाढविला आहे.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४१७ उमेदवार आहेत. पैकी २५७ उमेदवार आपल्या बाजूने असल्याचा दावा सतेज पाटील यांनी केल्यानंतर भाजपकडून हा आकडा २६४ पर्यंत दावा केला आहे. यामुळे प्रथमदर्शनीच आकडेमोडीची झुंज सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मतदारांना आकर्षित करण्याचे समर सुरू होत असून त्यात लक्ष्मीदर्शनाचा मुद्दा अधिक प्रभावी ठरू शकतो.

या पातळीवर कोण आघाडी घेणार त्याच्या गळय़ात विजयश्री पडू शकते. यादृष्टीने दोन्ही परिवाराने कंबर कसली आहे.

पुन्हा पाटील विरुद्ध महाडिक

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या दोन दशकात सतेज पाटील विरुद्ध महादेव महाडिक असा संघर्ष पहायला मिळत आहे. महाडिक यांच्यासमवेत पाटील यांनी राजकारणाची सुरुवात केली. त्यातून पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली. पुढे ते गृहराज्यमंत्री झाले. मोठी विकास कामे करूनही २९१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नवख्या अमल महाडिक यांनी पाटील यांना पराभूत केले. भाजप व महाडिक यांचा जिल्ह्यातील राजकीय दबदबा अधिक ठळक झाला. सहा वर्षांपूर्वी ही निवडणूक जाहीर झाल्यावर झाली.

सलग तीन वेळा कॉंग्रेसकडून निवडणूक जिंकलेले विधान परिषद सदस्य महादेवराव महाडिक यांची भाजपशी सलगी वाढली होती. सतेज पाटील यांनी दिल्ली दरबारी प्रयत्न करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली. तर महाडिक हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून आखाडय़ात उतरले. तब्बल ६३ मताच्या फरकाने विजय मिळवत सतेज पाटील यांनी गुरूलाच अस्मान दाखवले. पुढे पाटील – महाडिक सत्ता संघर्ष अधिकच टोकदार होत गेला. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे आमदार असतानाही पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात प्रचाराची राळ उडवून पराभूत केले. विधानसभा निवडणुकीत पुतण्या ऋतुराज पाटील यांना उतरवून अमल महाडिक यांना पराभूत करून पराभवाचा वचपा काढला.

पाठोपाठ जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आणून महाडिक यांना सत्तेपासून रोखले. महाडिक यांच्या राजकारणाचा अर्थ स्रोत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतीने आपला झेंडा रोवला. जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार निवडून आणल्याने पाटील राजकारणात अधिकच सतेज होत गेले. आता पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडिक असा प्रतिष्ठेचा मुकाबला होत आहे.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला 

या निवडणुकीमध्ये भाजपचीही कसोटी लागणार आहे. विशेषत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, गोकुळ अशा निवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागले आहे. आता महाविकास आघाडी एकत्र असतानाही त्यांना एकटा भाजप पुरू शकतो हे दाखवण्याची नामी संधी भाजपला मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाडिक कुटुंबीयांशी निकटचे संबंध असल्याने त्यांच्या दृष्टीनेही निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. हा संदर्भ पाहता ही निवडणूक चंद्रकांत पाटील विरुद्ध सतेज पाटील यांच्यातील श्रेष्ठत्वाचा दाखला देणारी ठरणार असल्याने त्याचे वेगळेच महत्त्व आहे.