सांगली : सांगली महापालिकेत सत्तास्थापनेत भाजप आणि राष्ट्रवादी  काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असून महापौरपदी भाजपचे धीरज सुर्यवंशी यांचे नाव आघाडीवर आहे. उपमहापौरपद राष्ट्रवादीला मिळणार असून यासाठी नाव अद्याप निश्‍चित झालेले नसल्याची माहिती मंगळवारी मिळाली. स्थायी समितीबाबत निर्णय अनिर्णित ठेवण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर निवडी दि. १० फेब्रुवारी रोजी होणार आहेत. या पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची उद्या अंतिम मुदत आहे. यामुळे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महापौर पदाबाबत चर्चा करण्यात आली. महापौर पदाचे भाजप उमेदवाराचे नाव उद्या जाहीर केले जाणार आहे. महापौर पदासाठी धीरज सुर्यवंशी, निरंजन आवटी, अतुल माने, संतोष पाटील, रोहिणी पाटील, स्वाती शिंदे यांची नावे चर्चेत असली तरी अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन महापौर देण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले असून या पहिल्या टप्प्यात सुर्यवंशी व दुसर्‍या टप्प्यात आवटी यांना संधी देण्याचे निश्‍चित  झाले असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी दिली.

दरम्यान, महापालिकेत भाजपचे संख्याबळ ३९ असून स्थिर सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर पद भाजपकडे आणि  उपमहापौरपद  राष्ट्रवादीकडे सोपवले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे  महापालिकेत १६ सदस्य असून सोमवारीच  गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांची निवड करण्यात आली आहे. उपमहापौरपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. आज संध्याकाळी याबाबत बैठक होउन नाव निश्‍चित केले जाणार असल्याचे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत १९ जागा जिंकून काँग्रेस दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. काँग्रेसच्या  गटनेतेपदाचीही अद्याप निवड करण्यात आली नाही. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र असल्याने सभागृहातील विरोधी पक्ष नेते  पद  काँग्रेसकडे जाणार आहे. या पदासाठी संजय मेंढे, मंगेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.

महापौर काँग्रेसचाच होईल असा विश्‍वास काँग्रेसचे जेष्ठ सदस्य  मेंढे यांनी व्यक्त केला असून याबाबत आज काँग्रेसचे नेते आमदार विश्‍वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याशी चर्चा करून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे नेते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने गटनेता निवड व नोंदणी लांबणीवर पडली असून आज  याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.