सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य फोडून भाजपने पुन्हा बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपला पाठिंबा देणाऱ्या लता कर्णे आणि ऋतुजा शिंदे यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. आज भाजपच्या ऋषिकेश धायगुडे पाटील आणि तेजस्विनी कदम यांना ही सभापतिपदाची संधी मिळाली आहे. आज विषय समित्यांच्या निवडीत भाजपचे दोन तर राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्यांनाही सभापतीची संधी मिळाली.

या निवडीच्या बैठकीवर राष्ट्रवादी शिवसेना सदस्यांनी सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळेत पोहोचू दिले नाही, असा आरोप करत कायदा धाब्यावर बसवणाऱ्या प्रशासनाचा व भाजपचा सभागृहात व जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बैठक ठोकून विरोधी घोषणा देत निषेध केला. काळ्या फिती लावून या निवडीवर बहिष्कार घातला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाच्या पक्षपातीपणाचा आणि भाजपने सदस्य फोडून केलेल्या दांडगाईच्या आरोपांमुळे ही निवडणूक पुन्हा गाजली.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबरोबर विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूकही भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत झालेल्या गोंधळात आणि झटापटीनंतर शनिवारी होणाऱ्या सभापती निवडीची बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपली रणनीती ठरवली होती.

आधीच्या निवडणुकीत सदस्य फोडल्यामुळे यावेळी मात्र सर्वांनी सावध पवित्र घेतला होता. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादी, शिवसेनेने आपले सदस्य सुरक्षित ठिकाणी हलवले होते. यावेळी भाजपने आपले सदस्य सुरक्षितस्थळी हलवले होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले सभापती करण्याच्या दृष्टीने ठरवलेली रणनीती यशस्वी ठरली आहे.

सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर ऋतुजा शिंदे फुटल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी दिली. तसेच पोलिसांनी आम्हाला सभागृहात वेळेवर पोहोचू नये म्हणून ठिकठिकाणी आमची अडवणूक केली. पोलिसांनी आम्हाला अर्धा तास अडवून ठेवले होते, असा आरोप बापू शिंदे आणि संदीप मांडवे यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतिपद दिले जाते. त्यामुळे शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण या चार समित्यांच्या सभापतिपदासाठी भाजपकडून चारच उमेदवारी अर्ज आले होते. छाननीअंती कोणाताही आक्षेप नसल्याने चारही अर्ज वैध ठरल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ऋतुजा विराज शिंदे यांना महिला व बाल कल्याण सभापतिपद देण्यात आले असून ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्याकडे समाज कल्याण सभापतिपद सोपविण्यात आलेले आहे. राष्ट्रवादीतून भाजपच्या गोटात दाखल झालेल्या लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांना शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन यापैकी कोणते सभापतिपद मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऋतुजा शिंदे, ऋषिकेश धायगुडे-पाटील, लता कर्णे, तेजस्विनी कदम या चौघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. त्याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली. शिवसेना-राष्ट्रवादीचे पुरेसे संख्याबळ असतानाही भाजपने कुरघोडी करत जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षासह राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्यांना संधी देत जिल्हा परिषदेवर आपली आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.