कोल्हापूर: कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वार्थी राजकारणासाठी हद्दवाढ रोखण्याबरोबरच प्राधिकरणाची वाट लावली , असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.
पुण्यात ५० गावे हद्दवाढीत समाविष्ट होतात, तशी हिम्मत कोल्हापुरात दाखवणार का, असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी हद्दवाढीत समाविष्ट करावयाच्या संभाव्य पाच गावांची नावे जाहीर करावीत. त्यामध्ये कळंबा, पाचगाव या गावांना हात लावायची हिंमत आहे का, असे आव्हान त्यांनी दिले.
राजर्षी शाहू जन्मस्थळ विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी १३ कोटी रुपये निधी दिला होता. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी माहिती घेऊन बोलावे, असा टोमणा त्यांनी मारला.
रोजगार, सार्वजनिक वाहतूक सुधारणा ते नाटय़गृह
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व उमेदवार सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. युवक-युवतींच्या रोजगारासाठी प्रयत्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पाठपुरावा, कोल्हापुरात नवे नाटय़गृह विकसित करणे, महिला बचत गटासाठी ई-कॉमर्स सुविधा, आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी सदृढ कोल्हापूर, निरोगी कोल्हापूर, आरोग्य तुमच्या दारी असे उपक्रम राबवण्याचे वचन देण्यात आले आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांना वरचे स्थान दिले जाणार असल्याचे त्यांनी घोषित केले.