कोल्हापूर : महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या फसव्या कर्जमाफीविरोधात मंगळवारी भाजप व मित्रपक्षांच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुमारे पाच हजार शेतकरी सहभागी झाले होते.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याने त्या विरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलनाला आज कोल्हापूर शहरातून प्रारंभ केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या मोर्चाच्या निमित्ताने भाजपने प्रथमच रस्त्यावर उतरून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

‘सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे’अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, महेश जाधव, राहुल चिकोडे, बाबा देसाई  यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले. भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी वर टीका केली.

मुश्रीफ, सतेज यांच्यावर टीकास्त्र

या वेळी चंद्रकांत पाटील यांनी ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे, अशी टीका मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर केली होती.

त्याचा समाचार घेताना पाटील म्हणाले, ‘आजही माझा चेहरा पूर्वीसारखाच ताजातवाना आहे. सत्ता नसताना तुमचा चेहरा मात्र कोमेजला होता. मला धक्का बसला आहे की नाही याची काळजी मुश्रीफांनी करण्याची गरज नाही. त्यासाठी महालक्ष्मी समर्थ आहे.  नाचता येईना अंगण वाकडे अशी त्यांची अवस्था झाली आहे.’

‘सतेज पाटील यांनी आपली क्षमता ओळखली पाहिजे,’ असा टोला लगावून चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कर्जमाफीसारखे निर्णय राज्यव्यापी स्वरूपाचे असल्याने त्याचा राज्य नेतृत्वाने निर्णय घ्यायला हवा. सतेज पाटील हे पालकमंत्री असले तरी कॅबिनेटमध्ये त्यांना बसता येत नाही. त्यांनी अवास्तव विधान करू नये.’

कोल्हापूर कर्जमाफीपासून वंचित

आमच्या सरकारवर पावणेचार लाख कोटींचे कर्ज असतानाही ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. त्यातील १९ हजार कोटी रुपये वाटले. हे सत्ताधाऱ्यांना मान्य आहे. त्यामुळेच त्यांनी सन २०१५ नंतरची कर्जमाफी जाहीर केली आहे. आताच्या कर्जमाफीमुळे कोल्हापूर जिल्ह्यतील शेतकऱ्यांना दमडीचा ही लाभ होणार नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.