|| दयानंद लिपारे
कोल्हापूर, कागलपाठोपाठ सातारच्या गादीचे वारसही भाजपात दाखल
राज्यातील छत्रपतींच्या घराण्यातील वारसदारांना ‘कमळा’च्या सौंदर्याने मोहात पाडले आहे. ऐतिहासिक बेरजेच्या राजकारणात कोल्हापूर, कागल पाठोपाठ सातारा गादीच्या वारसदारांनी हीच वाट पकडत भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर छत्रपती शिवरायांचे वारस असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या राजकारणात सातारा, कोल्हापूर, कागल, नागपूर, अक्कलकोट येथील ऐतिहासिक घराण्यांनी देखील आपले अस्तित्व निर्माण केले आहे. कोल्हापूरच्या विजयमाला राणीसाहेब, नागपूरच्या भोसले राजघराण्याच्या स्नुषा, रामटेकच्या खासदार चित्रलेखा राजे भोसले, कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे, आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती, सातारा गादीचे अभयसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, अक्कलकोट संस्थानच्या महाराणी निर्मलाराजे भोसले यांनी राजकारणात वेळोवेळी प्रभाव पाडला आहे. या घराण्यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही समाजात असल्याने बहुतेक सर्वच राजकीय पक्षांना या घराण्यांविषयी आणि त्यांच्या वारसांविषयी एक सुप्त आकर्षण आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची अनेक वर्षे या घराण्यांनी काँग्रेसच्या जोडीने राजकारण केले. पुढे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यावर सातारा आणि कोल्हापूरच्या गादीने या पक्षाशी जुळवून घेतले होते. परंतु पुढे बदलत्या काळात आणि राजकारणात या दोन्ही घराण्यांचे या पक्षाशी असलेले सूत विस्कटत गेले आणि आज खासदार उदयनराजे वगळता ही दोन्ही घराणी राष्ट्रवादीपासून दूर गेली आहेत. खासदार उदयनराजे हे देखील राष्ट्रवादीत असले तरी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले त्यांचे सख्य उघड आहे.
मराठा आरक्षणाच्या अनेक वर्षांच्या लढाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी आकार दिल्यानंतर मूळातच हा समाज मुख्यमंत्री आणि भाजपच्या पाठीशी गेला. या लढाईत मुख्यमंत्र्यांच्यासोबत कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी मोठे योगदान दिले. यामुळे भाजपमध्येही संभाजीराजे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. पुढे २०१५ मध्ये त्यांना भाजपाच्या वतीने राष्ट्रपती कोटय़ातून राज्यसभा सदस्य करण्यात आले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. कागलचे समरजितसिंह घाटगे यांनीही संभाजीराजेंनंतर भाजपात प्रवेश केला. त्यांच्यावर सध्या ‘म्हाडा’पुणेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता यापाठोपाठ साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनाही पक्षात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उदयनराजेंचेही भाजपसख्य!
छत्रपती उदयनराजे भोसले यांचीही भाजप आणि मुख्यमंत्र्यांबरोबर असलेली सलगी सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या साताऱ्यातील विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा आवर्जून हजेरी लावलेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट त्या वेळी चर्चा घडवून गेली होती.