सोलापूर : देशातील लोकशाही व्यवस्था, घटनात्मक स्वायत्त संस्था आणि केंद्रीय निवडणूक प्रक्रियेविषयी विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम व अपप्रचार केला जात असल्याचा घणाघाती आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव, देश बचाव’ या अभियानांतर्गत आयोजित या विराट मोर्चातून भाजपने थेट काँग्रेसला लक्ष्य करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हजारो कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने अवघे सोलापूर शहर भाजपमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक दरम्यान मोर्चा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा बाळीवेस आणि टिळक चौक मार्गावरून कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसरात पोहोचला, जिथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर राजकीय वातावरण तापले होते. हातात पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि प्रमुख नेत्यांची छायाचित्रे असलेले टी-शर्ट परिधान करून तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, ‘भारत माता की जय’ आणि पक्षीय घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या समर्थकांचे जथ्थे आणून केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शहराचा मध्यवर्ती भाग व्यापून गेला. दरम्यान, ऐन सणासुदीच्या तोंडावर निघालेल्या या गर्दीमुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
काँग्रेसला देशात अराजकता माजवायची आहे : पालकमंत्री जयकुमार गोरे..
जाहीर सभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर चौफेर हल्ला चढवला. “काँग्रेसला परकीय शक्तींच्या पाठबळावर देशात अराजकता निर्माण करायची आहे. हातामध्ये संविधान घेऊन प्रत्यक्षात लोकशाहीला तडा देण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने पूर्ण बहुमताने निवडून दिले असून, निवडणूक संस्थांवर अविश्वास दाखवून विरोधक थेट जनमताचा अवमान करत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. मतदार याद्यांच्या मुद्द्यावर विरोधकांना धारेवर धरताना पालकमंत्री म्हणाले, “मतदार यादीच्या शुद्धीकरणातून बांगलादेशी घुसखोर व बोगस मतदारांची नावे वगळली जातील, आणि त्यामुळे आपली हक्काची व्होटबँक संपुष्टात येईल, या भीतीपोटीच काँग्रेस रान उठवत आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर हलगी वाजवून नाटकं केली तरी मतदार यादीचे कायदेशीर शुद्धीकरण थांबणार नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाची चित्रफीत…
या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची विशेष चित्रफीत दाखविण्यात आली. “मोर्चानंतर परतताना सर्व कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या सणानिमित्त स्थानिक बाजारपेठेतूनच साहित्याची खरेदी करून स्थानिक व्यापाऱ्यांना बळ द्यावे,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या चित्रफितीतून केले. पक्षाच्या सर्व प्रमुख वक्त्यांनीही आपल्या भाषणात या स्थानिक खरेदीच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. याप्रसंगी माजी आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आक्रमक भाषणे झाली.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती…
या मोर्चात पालकमंत्री गोरे यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, माजी आमदार दिलीप माने, महापौर विनायक कोंड्याल, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महापालिकेचे माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सोलापूर शहर-जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
