भाजप-ताराराणी आघाडीकडून करवीरनगरीच्या विकासाचा संकल्प

कोल्हापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झाले नाही, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी दोषी असल्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Bihar Vidhan Sabha,बिहार विधानसभा
भाजप

करवीरनगरीला श्रीमंत बनवताना प्रत्येक करवीरकरही श्रीमंत व्हावा अशा पद्धतीने करवीरनगरीचा नियोजनबद्ध विकास करण्याचा भाजप-ताराराणी आघाडीचा संकल्प आहे. महापालिकेत सत्ता येण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास असून सत्तारूढ झाल्यानंतर पर्यटन विकास, महिला बचतगटांसाठी मोफत मॉल, विमानतळ विस्तारीकरण, औद्योगिक विकास अशा सर्वागीण नगरीचा विकास घडवून आणणार आहोत, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरनामा प्रकाशनप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी केली. कोल्हापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झाले नाही, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी दोषी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
करवीरनगरीला श्रीमंत कसे बनवणार, याचे विवेचन करताना पाटील म्हणाले, शहरात सर्व प्रकारच्या दर्जेदार नागरी सुविधा देण्यासाठी आघाडी बांधील आहे. पण यापुढे जाऊन कोल्हापुरात पर्यटन केंद्रांचा विकास केला जाईल. यामुळे अंबाबाईला येणारा भाविक येथे थांबेल व शहराला उत्पन्नाचे साधन निर्माण होईल. शहरात बचतगटांची संख्या वाढली आहे. मात्र त्यांना मार्केट उपलब्ध होत नाही. घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारून ही वीज महापालिकेसाठी वापरून वीजबिलात बचत करू. तर अतिरिक्त वीज विकून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिले जाईल. याचबरोबर सौरऊर्जेची उपकरणेही बसवून अधिक उत्पादन मिळवण्यावर भर राहील. अमृत योजनेतून शहराच्या विकासासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्याकडून आणला जाईल, अशी हमी त्यांनी दिली.
गुन्हेगार उमेदवार.. छे छे
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ताराराणीचे उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देण्यासाठी आघाडीचे सुनील मोदी, सुहास लटोरे हे दोघेही एकाच वेळी पुढे सरसावले. त्यांनी आम्ही कोणत्याही गुन्हेगार व्यक्तीला उमेदवारी दिली नसल्याचे आक्रमकपणे सांगत असा आरोप करत असतील त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे प्रतिआव्हान दिले. तर आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक यांनी भाजप-ताराराणी आघाडीचा जाहीरनामा एकच असल्याचे स्पष्ट करीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी महापालिकेत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. या वेळी आमदार अमल महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम, भाजप शहराध्यक्ष महेश जाधव, स्वाभिमानीचे भगवान काटे, आरपीआयचे उत्तम कांबळे उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp tararani lead will develop kolhapur